Udayanraje Bhosale | प्रशासकीय इमारतीस छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव द्यावे

सत्यजितसिंह पाटणकर यांचे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या माध्यमातून शासनास निवेदन
Udayanraje Bhosale|
खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांना निवेदन देताना सत्यजितसिंह पाटणकर, समवेत आ. रवींद्र चव्हाण, याज्ञसेन पाटणकर, हिंदुराव पाटील, विक्रमबाबा पाटणकर आदी मान्यवर.Pudhari Photo
Published on
Updated on

पाटण : पाटण विधानसभा मतदारसंघाचे नेते सत्यजितसिंह पाटणकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर प्राधान्याने पाटण येथील प्रशासकीय इमारतीस छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव देण्याची मागणी राज्य शासनाकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.

यावेळी भाजपचे प्रदेश कार्याध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण, खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार अतुल भोसले, विधानसभा प्रचार प्रमुख विक्रमबाबा पाटणकर, ज्येष्ठ नेते हिंदुराव पाटील, रमेश पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. शासनाला देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पाटण येथील श्री शिवजयंती महोत्सव समितीकडून मागील 65 वर्षांपासून समाजात शिवसंस्काराचा आणि विचारांचा जागर करण्यात येत असून या समितीकडून प्रतिवर्षी शिवजयंती साजरी करण्याबरोबरच इतिहास संवर्धन उपक्रमांचे आणि विविध सामाजिक उपक्रमांचे कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते.

समृद्ध असा ऐतिहासिक वारसा लाभलेली पाटणची भूमी ही साक्षात शिवप्रभूंच्या पदस्पर्शाने पावन झालेली आहे. सुंदरगड तथा दातेगड, गुणवंतगड हे त्याचे साक्षीदार आहेत. रयतेच्या हिताचा कारभार करताना छत्रपती शिवाजी महाराज यांनी घेतलेला प्रत्येक निर्णय हा सर्वसामान्य जनतेच्या हिताला न्याय देणार होता.पाटण तालुक्यातील सर्वसामान्य जनतेच्या हिताच्या कामकाजाच्या निमित्ताने पाटण येथे नवीन प्रशासकीय इमारतीचे बांधकाम सुरू असून येणार्‍या काळात या इमारतीमधून तालुक्यातील सर्वसामान्य जनतेच्या हिताचे निर्णय तसेच त्यांच्या अडीअडचणी सोडवल्या जाणार आहेत. अशावेळी या बहुउद्देशीय प्रशासकीय इमारतीस रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी करत आहोत, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

युवा उद्योजक याज्ञसेन पाटणकर, माजी सभापती राजेश पवार, माजी पंचायत समिती सभापती राजाभाऊ शेलार, रवी पाटील, शंकर शेडगे, गुरुदेव शेडगे, पाटण अर्बन बँक चेअरमन बाळासाहेब राजे महाडिक, खरेदी विक्री संघ चेअरमन अ‍ॅड. अविनाश जानुगडे, विक्रमसिंह पाटणकर दूध संघ चेअरमन सुभाषराव पवार, पाटणचे उपनगराध्यक्ष सचिन कुंभार आदी मान्यवर पदाधिकार, कार्यकर्ते, शिवप्रेमी उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news