

खंडाळा / शिरवळ : सावित्रीबाई फुले यांच्या स्मारकाचे भूमिपूजन करण्याचा मान मिळाला, हे माझे भाग्य आहे. जे प्रेरणास्रोत आहेत, त्यांचे स्मारक असणे आवश्यक आहे. नायगावमध्ये केवळ स्मारक नव्हे, तर महिला सक्षमीकरणासाठी आवश्यक त्या सर्व गोष्टी इथे केल्या जातील. महात्मा फुले व सावित्रीमाईंच्या विचाराने काम करण्याचा प्रयत्न सरकार करत आहे. नायगावच्या ग्रामसभेने निर्णय घेतला व ग्रामविकास विभागाने प्रस्ताव पाठवल्यास मंत्रिमंडळ त्याला विनाविलंब मंजुरी देऊन नायगावचे सावित्रीनगर करू, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
दरम्यान, घोषणा झाल्यावर एका वर्षाच्या आत काम सुरू करण्याची जादू जयकुमार गोरे यांनी केली आहे. ग्रामविकास मंत्रिपदाला साजेसे काम केल्याचे कौतुकोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले.
नायगाव (ता. खंडाळा) येथे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या 195 जयंती सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे, ना. छगन भुजबळ, पालकमंत्री शंभूराज देसाई, ना. जयकुमार गोरे, ना. मकरंद पाटील, आ. मनोजदादा घोरपडे, आ. अतुलबाबा भोसले, आ. सचिन पाटील, आ. बळीराम शिरसकर, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर, जिल्हाधिकारी संतोष पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलिस अधीक्षक तुषार दोशी, धैर्यशील कदम, माजी आमदार मदनदादा भोसले, राम सातपुते, समता परिषदेचे कल्याण आखाडे, सावता माळी यांचे वंशज सावता महाराज, वाईचे नगराध्यक्ष अनिल सावंत, दीपक ननावरे, सुनील काटकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
यावेळी ना. देवेंद्र फडणवीस म्हणाले, जेव्हा जेव्हा अन्याय होईल तेव्हा याच स्मारकातून बीजे पेरली जातील. त्यामुळेच स्मारक तयार करण्याचा प्रयत्न करत आहे. मागील वर्षी घोषणा केल्यानंतर ना. जयकुमार गोरे यांनी रेकॉर्ड स्पीडमध्ये याचे काम पूर्ण केले. घोषणा केल्यानंतर एक वर्षाच्या आत जागा मिळाली. आराखडा मंजूर झाला आणि कामही झाले, हे असे कधीच यापूर्वी घडले नव्हते. ही जादू ना. गोरे यांनी केली. ना. गोरे यांनी त्यांच्या ग्रामविकास मंत्रिपदाला सार्थ असे काम केले. लाडक्या बहिणींना सक्षम करणे सरकारचे कर्तव्य आहे.
सावित्रीबाई फुले यांनी मोठ्या प्रमाणात महिलांसाठी काम केले. त्यामुळेच स्मारक परिसरात महिला सक्षमीकरणासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व सुविधा देण्याचा प्रयत्न करणार आहे. सरकारने नेहमीच महामानवांचा सन्मान केला आहे. सावित्रीबाई फुले यांच्या नावानेच मुलींना उच्च शिक्षण मोफत दिले जात आहे. त्यांच्याच नावाने सुरू असलेल्या योजनेतून महाराष्ट्रातील मुली सावित्रीमाईंच्या नावाने उच्च शिक्षण घेत आहेत, याचा अभिमान वाटतो. हे स्मारक उभारण्यासाठी जिल्हाधिकारी संतोष पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांच्यासह प्रशासनाने ना. गोरे यांना जी साथ दिली ती कौतुकास्पद आहे.
ना. जयकुमार गोरे म्हणाले, आजचा दिवस हा महाराष्ट्र व देशातील फुले विचारांच्या लोकांच्या दृष्टीने ऐतिहासिक आहे. प्रत्येक जयंती कार्यक्रमाला मुख्यमंत्री येतात दर्शन घ्यायचे. स्मारकाचा विषयही चर्चेला येत असायचा. गेली अनेक वर्षे हा विषय चर्चेतच राहिला. हा विषय प्रत्यक्षात मार्गी लागण्यासाठी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होण्याची वाट पहावी लागली. जी भूमिका आपण घेतली त्या भूमिकेच्या पाठिशी राहिलात. गतवर्षी मला ग्रामविकास खात्याची जबाबदारी दिली. जसा सावित्रीमाईंनी प्रस्थापितांविरोधात संघर्ष केला तोच संघर्ष माझ्याही वाट्याला आला. सावित्रीमाईंच्या विचाराला न्याय देण्याची भूमिका मी घेतली. त्यांचे भव्य दिव्य स्मारक उभारण्याचा निर्धार केला व तो आज पूर्ण झाला. यानिमित्त देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले पाहिजे. जर फडणवीस मुख्यमंत्री झाले नसते तर हे स्मारक झाले नसते. मुख्यमंत्र्यांनी एका वर्षापूर्वी फक्त आश्वासन दिले नाही तर कृती केली.
स्मारक उभारल्यानंतर सावित्रीमाईंच्या विचाराला न्याय मिळेल. स्मारक उभे करत असताना त्यांचा विचार जिवंत रहावा, यासाठी महिलांच्या प्रशिक्षणाच्या सुविधा उपलब्ध करत आहोत. 110 कोटींमध्ये हे स्मारकाचे काम संपणार नाही. या कामासाठी आणखी 50 कोटींच्या निधीची गरज आहे. हा निधी सरकारने द्यावा. जागेचा प्रश्न आम्ही सोडवत आणला आहे. सुदैवाने पालकमंत्री व पर्यटनमंत्री साताऱ्याचे आहे त्यांनी एमटीडीसीची जागा द्यावी. पुढच्यावर्षी ही मागणी करू देवू नका, अशी विनंती आहे.
महात्मा फुलेंचे मूळ कटगुणचे आहे. त्यांचे मूळ गाव गोरे आहे. माझेही गाव कटगुण व आडनाव गोरे आहे. कटगुणमध्येही महात्मा फुलेंचे स्मारक असावे, अशी अपेक्षा आहे. आता कटगुणमध्येही महात्मा फुलेंचे भव्यदिव्य स्मारक उभारण्याचा निर्णय घेत आहोत. महान व्यक्तींच्या विचाराला फडणवीस यांनी बळ दिले आहे. शाहू, फुले व आंबेडकर यांची शक्तीस्थाने मजबूत झाली पाहिजे. ही भूमिका सरकारने घेतली. ही सर्व शक्तीस्थाने उभारत बळ देण्याचे काम व विचाराला जिवंत ठेवण्याचे काम करत आहात. आपण आमच्या पाठिशी उभा राहिला, याचा अभिमान आहे. या विचाराचे लोक कायम आपले ऋणी राहतील.
ना. मकरंद पाटील म्हणाले, सावित्रीबाई फुले व महात्मा फुले यांचे कार्य शब्दात मांडता येणार नाही. पहिली मुलींची शाळा काढून सावित्रीबाई फुले यांनी शैक्षणिक क्रांती केली. नायगाव येथील स्मारक आराखड्यासाठी पाठपुरावा करत होतो. या प्रकल्पाला ना. एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री व आपण उपमुख्यमंत्री असतानाच चालना मिळाली. या स्मारकाचे भूमिपूजन होत असल्याचा आनंद आहे. ग्रामीण भागात क्रांतीज्योतींच्या नावाला साजेसे शैक्षणिक संकुल या परिसरात व्हावे, हीच त्यांना आदरांजली ठरेल. कृषी व औद्योगिक क्षेत्रात खंडाळा आघाडीवर आहे. येथे शैक्षणिक हब झाल्यास तालुक्याचे स्थान अधिक भक्कम होईल, असेही ते म्हणाले. प्रास्ताविक सरपंच स्वाती जमदाडे यांनी केले.
माजी उपाध्यक्ष नितीन भरगुडे, माजी सभापती राजेंद्र तांबे, बाळासाहेब ोळसकर, प्रदीप माने, अनुप सुर्यवंशी, आदेश जमदाडे, निखील झगडे, अनिरुद्ध गाढवे, अतुल पवार, ऋषीकेश धायगुडे, प्रकाश परखंदे, शारदा जाधव, राजेंद्र नेवसे, शिक्षणाधिकारी अनिस नायकवडी, गटविकास अधिकारी अनिल वाघमारे, गटशिक्षणाधिकारी गजानन आडे आदी मान्यवर उपस्थित होते.
ना. छगन भुजबळ म्हणाले, 1993 मध्ये अनेक अडचणी आल्या त्यानंतरही स्मारक उभारले. त्यावेळी 20 लाख रुपयांचे काम करतानाही समस्या आल्या. मात्र, आता काय तर दीडशे कोटी मंजूर झाले. त्यामुळे ‘देवाभाऊ देता हैं छप्पर फाडके’.याबद्दल मुख्यमंत्र्यांचे आभार मानतो. पुण्याचे फुलेवाड्याचे काम रेंगाळले आहे. त्याला गती दिली पाहिजे. दि. 11 एप्रिल 2027 ला महात्मा फुले यांची 200 वी जयंती आहे. महात्मा फुलेंची जयंती देशभर साजरी केली जाणार असल्याचा शब्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला आहे. यासाठी अजून एक ते दीड वर्षाचा कालावधी आहे. त्या अनुषंगाने सरकारने हालचाल करावी, अशी विनंती ना. भुजबळ यांनी केली.