

लोणंद : ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पावन स्मृतींना नतमस्तक होताना आज नायगावमध्ये सावित्रींच्या लेकी स्वतःला धन्य मानत होत्या. ‘आम्ही आहोत कारण सावित्रीबाई होत्या’ ही भावना प्रत्येक चेहऱ्यावर स्पष्टपणे उमटलेली दिसत होती. ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या 195 व्या जयंतीनिमित्त जन्मगाव नायगावात झालेला यावर्षीचा सोहळा केवळ कार्यक्रम न राहता तो स्त्री अस्मितेचा, संघर्षाचा आणि आत्मसन्मानाचा महोत्सव ठरला.
राज्यातील विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, कोकण यासह मुंबई, पुणे आदी महानगरांतून आलेल्या हजारो महिला व पुरुषांनी नायगाव अक्षरशः गजबजून टाकले होते. सकाळपासूनच स्मारक परिसर, गल्लीबोळ, रस्ते सावित्रींच्या लेकींच्या पावलांनी भरून गेले होते. गेल्या तीस वर्षांत प्रथमच जयंती कार्यक्रमाची जागा बदलण्यात आली आणि या बदलाने इतिहास घडवला. न भूतो न भविष्यति असा भव्य-दिव्य सोहळा यंदा अनुभवायला मिळाला.
नायगावात दाखल होताच अनेक महिलांच्या डोळ्यांत नकळत अश्रू तरळत होते. ‘ज्या स्त्रीमुळे आम्ही शिकलो, उभ्या राहिलो, स्वप्न पाहू लागलो, त्या माऊलीच्या जन्मगावी येताना मन भरून येते,” असे सांगताना अनेक महिला भावूक झाल्या.
एका ग्रामीण भागातून आलेल्या तरुणीने सांगितले, आज मी शिक्षिका आहे. पण माझ्या आजीने सांगितलेल्या गोष्टी आठवल्या की अंगावर काटा येतो. त्या काळी मुलींनी शाळेत जाणे म्हणजे पाप समजले जायचे. सावित्रीबाईंनी तो अंधार फोडला. म्हणूनच आज इथे येऊन त्यांच्या चरणी नतमस्तक होताना अभिमान वाटतो.’ अशी भावना व्यक्त केली .ही जयंती केवळ माळा अर्पण करण्यापुरती मर्यादित नव्हती. ती होती संघर्षाला सलाम करणारी, अन्यायाविरुद्ध उभे राहण्याची शपथ देणारी. अनेक महिलांनी सांगितले की, ‘नायगावात येणे म्हणजे आम्हाला पुन्हा एकदा आमची ओळख आठवणे. आम्ही केवळ घरात मर्यादित नाही, आम्ही बदल घडवणाऱ्या सावित्रींच्या लेकी आहोत.’ असेही सावित्रींच्या लेक राशीन येथील तुळसाबाई बबन गवळी यांनी सांगितले.
अनेक महिलांनी मन मोकळे करताना सांगितले की, सावित्रीबाई नसत्या तर आजही स्त्री शिक्षणाचा प्रवास इतका सोपा नसता. आमच्या आयुष्यातील प्रत्येक यशाच्या मागे त्यांचा संघर्ष उभा आहे. पुरुष वर्गातूनही मोठ्या प्रमाणावर उपस्थिती दिसून आली. सावित्रीबाई फुले म्हणजे केवळ महिलांच्या नाहीत, त्या संपूर्ण समाजाच्या उद्धारकर्त्या आहेत,” अशी भावना अनेक पुरुषांनी व्यक्त केली.
आज नायगावात जमलेली गर्दी केवळ आकड्यांची नव्हती, ती होती विचारांची, आत्मविश्वासाची आणि कृतज्ञतेची. सावित्रींच्या लेकींनी आजचा दिवस इतिहासात अजरामर केला. हा सोहळा म्हणजे सावित्रीबाईंच्या विचारांना जिवंत ठेवण्याचा संकल्प होता. नायगावच्या मातीने आज एकदा ज्ञानज्योती विझलेली नाही, ती सावित्रींच्या लेकींच्या मनामनात आजही तेजाने पेटलेली आहे असेच चित्र नायगावात पहायला मिळाले . नायगावातील संपूर्ण रस्यावर स्वागत फलक लावण्यात आले होते, तर दारात रांगोळी काढली. आज संपूर्ण नायगाव नगरी सण साजरा करत असल्याचे चित्र पहावयास मिळाले.