

प्रेषित गांधी
महाबळेश्वर : तब्बल आठ वर्षांनंतर होणारी महाबळेश्वर पालिकेची निवडणूक मतदानास अवघे दोन दिवस उरले असतानाच पुढे ढकलण्यात आल्याने उमेदवारांचे गणित पूर्णपणे बिघडले आहे. निवडणूक लांबणीवर पडल्याने निवडणुकीत उमेदवारांनी जो खर्चाचा घाट घातला होता तो वाया गेल्याने उमेदवारांच्या डोक्याला शॉट बसला आहे. पुन्हा एकदा निवडणुका होणार असल्याने वाढीव खर्च होणार आहे. त्यामुळे इच्छुकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. आता पुन्हा सर्व गोष्टी नव्याने परत कराव्या लागणार असल्याने उमेदवारांना आर्थिक भुर्दंड बसणार आहे.
‘पाकीटा’ची वाट पाहणार्या मतदारांनाही निवडणुका जाहीर झाल्यापासूनच ‘काही मिळतंय का?’ याची आशा होती दारात कोण येतंय याची रात्री उशिरापर्यंत वाट पाहणारे काहीजण निवडणूक पुढे ढकलल्याने निराश झाले आहेत. अनेकांनी माहेरवाशिनी, नोकरदार नातेवाईकांना मतदारयादीत नाव असल्यानिमित्ताने बोलावून घेतले होते, मात्र सर्वांचेच नियोजन कोलमडले.
नगराध्यक्ष पदासाठी तर तिहेरी धावपळ पहायला मिळाली. गुप्त बैठका, पॉडकास्ट मुलाखती आणि मतदार भेटीअशी ‘हॅटट्रिक’ कामे सांभाळावी लागत होती. घरातील ‘होम मिनिस्टर’नेही ‘मिसेस नगराध्यक्ष’ होण्याच्या उद्देशाने प्रचारात आघाडी घेतली होती. फ्लेक्स, जाहीरनामा, फोटोशूट, दिवसभराच्या नाष्ट्या जेवणावळी, तरुणांना रील्ससाठी दिले जाणारे मानधन या सर्व खर्चांनी उमेदवारांची आर्थिक परिस्थिती तंग झाली आहे. निवडणूक पुढे ढकलल्याने हे सर्व गणित पुन्हा मांडावे लागणार आहे. नगरसेवक होणार म्हटल्यावर खर्च तर करावाच लागतो; पण आता सांगायचं कुणाला? अशी उमेदवारांची कुजबुज सुरू आहे.
मतदारांमध्ये खोलवर रुजलेली ‘पाकीट संस्कृती’ महाबळेश्वरच्या राजकारणात वर्षांनुवर्षे एक ठरलेला ‘ट्रेंड’ आहे. पाच वर्षांतून एकदा दिसणारे बाहेरगावी राहणारे नोकरदार, माहेरवाशिणी, हॉटेल कर्मचारी यांची निवडणुकीत ‘विशेष’ बडदास्त असते. या सर्वांची ये-जा, राहण्याची व्यवस्था, आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे मिळणारे ‘पाकीट’. त्यामुळे अनेक मतदारांना महाबळेश्वरच्या विकासापेक्षा ‘स्वतःचा विकास’ अधिक महत्त्वाचा असल्याची चर्चा शहरभर सुरू आहे.