

सातारा : जिल्ह्यातील सात नगरपालिका आणि एका नगरपंचायतीसाठी मंगळवारी मतदान प्रक्रिया पार पडली. सातारा, वाई, पाचगणी, म्हसवड, कराड, मलकापूर, रहिमतपूर या पालिका तर मेढा नगरपंचायतीसाठी सरासरी 74 टक्के इतके चुरशीने मतदान झाले. एकूण 609 उमेदवारांचे राजकीय भविष्य मशिनबंद झाले. मतदानावेळी सातारा, रहिमतपूर, वाई, म्हसवडमध्ये मशिनमध्ये बिघाड झाल्याच्या घटना घडल्या. मात्र तातडीने मशिन बदलून मतदान पूर्ववत करण्यात आले.
जिल्ह्यातील सर्व नगरपालिका तसेच मेढा नगरपंचायतीच्या निवडणुकीच्या निमित्ताने गेल्या 15 दिवसांपासून राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री अजित पवार, ना. एकनाथ शिंदे यांच्यासह जिल्ह्यातील मंत्र्यांनी देखील निवडणुकीच्या प्रचारासाठी रान पेटवले होते. सोमवारी रात्री 10 वाजेपर्यंत जोरकसपणे उमेदवारांचा प्रचार सुरू होता. त्यानंतर मंगळवारी चुरशीने मतदान झाले.
जिल्ह्यातील सात पालिका व एका नगरपंचायतीसाठी मंगळवारी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 यावेळेत जिल्ह्यातील 374 मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया पार पडली. जिल्ह्यातील 374 केंद्रांवर सायंकाळी 5.30 पर्यंत मतदान घेण्यात आले. अनेक केंद्रांवर सायंकाळी मोठ्या रांगा लागल्यामुळे मतदान उशिरापर्यंत सुरु होते. या पालिकांमध्ये जिल्ह्यात 3 लाख 28 हजार 435 मतदार होते. सायंकाळी मतदानाची प्राथमिक टक्केवारी 74 पर्यंत पोहोचली होती.
रहिमतपूर नगरपालिकेत सर्वाधिक मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. मेढा नगरपंचायतीत मात्र विक्रमी 84.23 टक्के मतदान झाले आहे. सातार्यात मात्र मतदानाचा टक्का काहीसा कमी झाला. शहरात ताणतणावाच्या वातावरणात मतदान झाले. सातार्यात शिवसैनिकांना मारहाण झाल्याने शिवसेना पदाधिकारी, उमेदवार यांनी सातारा शहर पोलिस ठाण्यासमोरच ठिय्या मांडला.
सातारा : 60
कराड : 69.89
वाई : 73
रहिमतपूर : 81
पाचगणी : 80.80
म्हसवड : 79.85
मलकापूर : 68.5
मेढा : 84.23