Municipal Council Election Result 2025: पाचगणीत कऱ्हाडकरांची झुंज फोल; मकरंदआबांची सरशी

नगराध्यक्षपदासह 12 जागांवर राष्ट्रवादीचा विजय; अवघ्या दोन मतांनी दिलीप बगाडे जिंकले
Municipal Council Election Result 2025
Municipal Council Election Result 2025: पाचगणीत कऱ्हाडकरांची झुंज फोल; मकरंदआबांची सरशीPudhari Photo
Published on
Updated on

पाचगणी : पाचगणी नगरपालिकेच्या निवडणुकीत गेली अनेक वर्षे पालिकेचा गड राखणाऱ्या लक्ष्मी कऱ्हाडकर यांना राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी आव्हान दिले होते. दिलीप बगाडे यांना पाठिंबा देत अनेक उमेदवारांना पुरस्कृत केले होते. मतमोजणीनंतर जनतेने कऱ्हाडकर गटाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेवारासह अन्य उमेदवारांना नाकारत राष्ट्रवादीच्या हातात सत्तेच्या चाव्या दिल्या. त्यामुळे गेली अनेक वर्षे कऱ्हाडकरांचा गड असलेल्या पाचगणीला अखेर मकरंदआबांनी सुरूंग लावला. राष्ट्रवादीने नगराध्यक्षपदासह सत्ता खेचून आणली. नगराध्यक्षपदाच्या अटीतटीच्या सामन्यात राष्ट्रवादीच्या दिलीप बगाडे यांनी अवघ्या दोन मतांनी कऱ्हाडकर गटाच्या संतोष कांबळे यांच्यावर विजय मिळवला.

पाचगणीच्या नगरपालिकेच्या निवडणुकीत यंदा मतदारांनी राजकीय गणित पूर्णपणे बदलून टाकले. बराच काळ शहरात आपला दबदबा टिकवून ठेवलेल्या कऱ्हाडकर गटाचा किल्ला या निवडणुकीत कोसळला आणि राष्ट्रवादी पुरस्कृत अपक्ष उमेदवारांनी मुसंडी मारत नगराध्यक्ष पदासह तब्बल 12 जागांवर कब्जा केला. या निकालाने पाचगणीच्या राजकारणात उलथापालथ झाली आहे. कऱ्हाडकर गटाने प्रतिष्ठेचा प्रश्न मानून लावलेली झुंज फोल ठरली, तर राष्ट्रवादीच्या शिस्तबद्ध नियोजन व घर टू घर प्रचाराने कऱ्हाडकरांना फटका बसला. या निवडणुकीत दिलीप बगाडे यांना 2671 मते मिळाली तर विरोधी संतोष कांबळे यांना 2669 मते मिळाली.

पाचगणी पालिकेत दिलीप बगाडे यांनी अवघ्या दोन मतांनी बाजी मारली. पालिका निवडणुकीत प्रभाग 1 मधून वैभव कऱ्हाडकर यांनी 34 तर राजश्री सणस यांनी 73 मतांनी विजय मिळवला. प्रभाग 2 मध्ये सुप्रिया माने यांनी 172 तर नरेंद्र बिरामणे यांनी 161 मतांनी विजय मिळवला. प्रभाग 3 मधून आकाश बगाडे यांनी अवघ्या 5 मतांनी तर विमल भिलारे यांनी 190 मतांनी विजय मिळवला. प्रभाग 4 मध्ये परवीन मेमन यांनी 48 व शेखर कासुर्डे यांनी 148 मतांनी बाजी मारली. प्रभाग 5 मध्ये शिल्पा माने यांनी 106 तर प्रसाद कारंजकर यांनी 71 मतांनी लढाई जिंकली. प्रभाग 6 मध्ये माधुरी कासुर्डे यांनी तब्बल 378 मतांनी एकतर्फी तर विनोद बिरामणे यांनीही 31 मतांनी विजय मिळवला.

प्रभाग 7 मध्ये लक्ष्मी कऱ्हाडकर यांचा अवघ्या 44 मतांनी विजय झाला तर राजेंद्र पारठे यांनी तब्बल 165 मतांनी बाजी मारली. प्रभाग 8 मध्ये अमित कांबळे यांनी सचिन मोरे यांचा अवघ्या 11 मतांनी पराभव केला. कांबळे यांना 262 मते मिळाली. तसेच लक्ष्मी कऱ्हाडकर यांच्या सूनबाई अभिलाषा कऱ्हाडकर यांनी विरोधकांचा धुव्वा उडवत 189 मतांनी विजय मिळवला. प्रभाग 9 मध्ये स्वाती कांबळे यांचा 190 तर प्रकाश गोळे यांचा अवघ्या 3 मतांनी विजय झाला. प्रभाग 10 मध्ये महेश खांडके या नवख्या उमेदवाराने 74 मतांनी बाजी मारली. तसेच अमृता गोळे यांनी तब्बल 265 मतांनी विजय साजरा केला.

नगरसेवक पदाच्या निवडणुकांमध्ये काही प्रभागांचे निकाल अत्यंत अनपेक्षित लागल्याने शहराच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. प्रभाग क्रमांक 7 मध्ये नगरसेवक पदाची हॅट्ट्रिक करण्याच्या तयारीत असलेले बोधे यांना मतदारांनी नाकारले. बोधे हे या प्रभागातील मातब्बर आणि अनुभवी नेते म्हणून ओळखले जात होते. मात्र प्रत्यक्ष निकालात राजेंद्र पारटे यांनी त्यांचा पराभव करत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. या पराभवामुळे बोधे यांना धक्का बसला. प्रभाग क्रमांक 10 मध्येही नवखे उमेदवार महेश खांडके यांनी चार टर्म नगरसेवक असलेल्या दिलावर बागवान यांचा दारूण पराभव केला.

या प्रभागात अनेक वर्षे तोच उमेदवार असल्याने नव्या नेतृत्वाला जनतेने संधी दिली. या निवडणुकीत संतोष कांबळे हे कऱ्हाडकर गटाकडून अगदी सहज विजयी होतील, अशी हवा तयार करण्यात आली होती. सुरुवातीपासून त्यांचे पारडे जड असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात होते. मात्र प्रत्यक्ष निकालांनी हा भ्रम चक्क फुटला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्याने लढणारे दिलीप बगाडे यांनी फक्त दोन मतांच्या अत्यंत थरारक फरकाने निवडून आले. त्यामुळे लक्ष्मी कऱ्हाडकरांना दणका बसला आहे.

प्रशासकीय कालावधीत कऱ्हाडकर गटाच्या एकाही नगरसेवकाने नागरिकांच्या समस्यांना गांभीर्याने घेतले नाही. प्रत्येक वेळी नागरिकांना पालिकेचे उंबरठे झिजवावे लागले. कचरा, स्वच्छता व पाणी पुरवठा हे साधे प्रश्न सोडवण्यासाठीही माजी नगरसेवकांनी दुर्लक्ष केले. त्यानंतर निवडणुकीत आश्वासनांचा पाऊस पडला. परंतु, यंदा जनतेने सत्ता खेचून राष्ट्रवादीच्या ताब्यात दिली. कऱ्हाडकरांचा हा पराभव त्यांच्या राजकारणाला कलाटणी देणारा आहे. तर राष्ट्रवादीला बूस्टर ठरणारा आहे.

या नगरपालिका निकालाने पाचगणी शहराच्या राजकारणावर दुरगामी परिणाम होणार आहेत. नगराध्यक्ष पदासह नगरसेवक पदाच्या सर्व जागांसाठी कऱ्हाडकर गटाने प्रतिष्ठा पणाला लावली होती. प्रत्यक्षात निकालात मात्र चित्र वेगळे दिसले. नागराध्यक्षपदाचे उमेदवार संतोष कांबळे यांना फटका बसल्याचे मतदानाच्या आकडेवारीवरून दिसून आले. प्रतिस्पर्धी उमेदवार दिलीप बगाडे यांनी केलेले डावपेच यशस्वी झाल्याचे सिद्ध झाले.

नगराध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीत अत्यंत अटीतटीचा सामना पाहायला मिळाला. या चुरशीच्या लढतीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पाठिंबा असलेले उमेदवार दिलीप बगाडे यांनी अवघ्या दोन मतांच्या फरकाने विजय मिळवला. मतमोजणीदरम्यान प्रत्येक मताला विशेष महत्त्व प्राप्त झाले होते आणि निकाल शेवटच्या क्षणापर्यंत अनिश्चित होता. अखेर दिलीप बगाडे यांच्या बाजूने निकाल लागल्याने त्यांच्या समर्थकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले. या निकालामुळे नगरपालिकेच्या राजकारणात नवे समीकरण तयार होणार असल्याची चर्चा सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news