Municipal Council Election Result 2025: म्हसवडला 21 - झिरो ;‌ ‘जयाभाऊच हिरो‌’

पालिकेत एकहाती सत्ता; सिद्धनाथ नागरिक आघाडीचे पानीपत
Municipal Council Election Result 2025
Municipal Council Election Result 2025: म्हसवडला 21 - झिरो ;‌ ‘जयाभाऊच हिरो‌’Pudhari Photo
Published on
Updated on

म्हसवड : अत्यंत चुरशीने झालेल्या म्हसवड नगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपने ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या नेतृत्वाखाली जोरदार मुसंडी मारत नगराध्यक्षपदासह 21 जागा जिंकल्या. प्रतिस्पर्धी सिद्धनाथ नागरीक आघाडीला खातेही उघडता न आल्याने त्यांचे पानीपत झाले. पालिकेत भाजपची एकहाती सत्ता आली असून म्हसवडमध्ये 21- झिरो ‌‘जयाभाऊ‌’ हिरो, असेच वातावरण निर्माण झाले.

यंदा तब्बल नऊ वर्षांनंतर म्हसवड नगरपालिकेची निवडणूक झाली. नगराध्यक्षपदासह पालिकेच्या 21 जागांसाठी चुरशीने मतदान झाले होते. त्यामुळे निकालाबाबत प्रचंड उत्सुकता लागून राहिली होती. रविवारी सकाळी10 वाजता मेरी माता हायस्कूल येथे मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर अवघ्या काही तासात निकाल हाती येऊ लागले. सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या म्हसवड पालिकेच्या नगराध्यक्षपदी भाजप पक्षाच्या पूजा सचिन वीरकर यांनी जोरदार मुसंडी मारली. त्यांनी आपले प्रतिस्पर्धी उमेदवार सिद्धनाथ नागरिक आघाडीच्या भुवनेश्वरी तेजसिंह राजेमाने यांचा 4844 मतांनी पराभव केला. वीरकर यांना 11640 मते मिळाली तर विरोधी राजेमाने यांना 6796 मते मिळाली. नगराध्यक्ष पदाच्या अन्य उमेदवारांना आपला प्रभाव पाडता आला नाही. बहुजन समाज पार्टीच्या उमेदवार रूपाली वाल्मिक सारतापे यांना 113 मते मिळाली.

नगरसेवक पदाच्या 20 जागांपैकी सर्वांच्या सर्व 20 जागा जिंकून भाजप या पक्षाने पालिकेवर कब्जा मिळवला आहे. प्रभागनिहाय विजयी झालेले उमेदवार, कंसात त्यांचे पक्ष व मते अनुक्रमे अशी, प्रभाग 1अ : चैताली अनिल शिंदे (भाजपा- 998 मते), प्रभाग 1 ब : विजय रामचंद्र धट (भाजपा- 839 मते), प्रभाग 2 अ : सतीश शिवाजी मासाळ (भाजपा- 991 मते), प्रभाग 2 ब : सविता वसंत मासाळ (भाजपा- 1171 मते), प्रभाग 3 अ : लखन मारुती लोखंडे (भाजपा- 1196 मते), प्रभाग 3 ब : दीपाली धनंजय शिंदे (भाजपा- 1085 मते), प्रभाग 4 अ : माधुरी महेश लोखंडे (भाजपा- 899 मते), प्रभाग 4 ब : अखिल मैनुद्दीन काझी (भाजपा- 999 मते), प्रभाग 5अ : श्रीदेवी निशांत पिसे (भाजपा- 1412 मते), प्रभाग 5 ब : प्रज्योत किरण कालढोणे (भाजपा- 1505 मते), प्रभाग 6 अ : आकाश बाळासाहेब पानसांडे (भाजपा- 843 मते), प्रभाग 6 ब : स्नेहल युवराज सूर्यवंशी ( भाजपा-958 मते), प्रभाग 7अ : प्रमिला जयंत ढाले (भाजपा-978 मते), प्रभाग 7 ब : युवराज दिनकर सूर्यवंशी (भाजपा- 864 मते), प्रभाग 8 अ : अरुणा महेश गायकवाड (भाजपा- 1034 मते), प्रभाग 8 ब : महावीर गिरजाप्पा वीरकर (भाजपा- 993 मते), प्रभाग 9 अ : पूनम नारायण वीरकर (भाजपा- 1424 मते), प्रभाग 9ब : विजय रामचंद्र बनगर (भाजपा- 1422 मते), प्रभाग 10 अ : स्वाती दीपक बनगर (भाजपा- 1461 मते), प्रभाग 10 ब : अभिषेक अप्पा वीरकर (भाजपा- 1400 मते), या नगरपालिका निकालाने म्हसवड शहराच्या राजकारणावर दुरगामी परिणाम होणार आहेत.

नगराध्यक्ष पदासह नगरसेवक पदाच्या सर्व जागांसाठी ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे यांनी प्रतिष्ठा पणाला लावली होती. प्रभाग क्रमांक 5 ब मधून प्रज्योत किरण कलढोणे हे सर्वाधिक 1505 मते घेऊन विजयी झाले. नोटाला नगरसेवकपदासाठी 316 मते पडली आहेत तर नगराध्यक्षपदासाठी 103 मते पडली आहेत. निकाल जाहिर होताच मंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थित नगराध्यक्षपदाच्या विजयी उमेदवार पूजा सचिन वीरकर तसेच सर्व विजयी नगरसेवक यांची ढोल-ताशाच्या निनादात गुलालाची उधळण करत मोठ्या उत्साहात शहरातून मिरवणूक काढण्यात आली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news