Satara Municipal Council Election Result 2025: जिल्ह्यात कमळाची लाट; मविआ भुईसपाट

7 पालिकांत भाजप सुसाट : राष्ट्रवादी 2, स्थानिक आघाडीकडे 1 जागा
Satara Municipal Council Election Result 2025
Satara Municipal Council Election Result 2025: जिल्ह्यात कमळाची लाट; मविआ भुईसपाटPudhari Photo
Published on
Updated on

सातारा : सातारा जिल्ह्यातील 10 पैकी 7 नगरपालिकांच्या नगराध्यक्षपदावर भाजपने भगवा झेंडा रोवला. सातारा, वाई, फलटण, मलकापूर, म्हसवड, रहिमतपूर या सहा नगरपालिका आणि मेढा नगरपंचायत अशा एकूण सात ठिकाणच्या थेट नगराध्यक्षपदावर भाजपचे कमळ फुलले. सात पालिकांत भाजपची लाट, कमळाचा थाट व मविआ भुईसपाट अशी परिस्थिती निर्माण झाली. राष्ट्रवादी अजित पवार गटाने महाबळेश्वर आणि पाचगणीत सत्तेपर्यंत धडक मारली, तर कराड पालिकेवर लोकशाही विकास आघाडी आणि यशवंत विकास आघाडीने भाजपचा वारू रोखत सत्ता काबीज केली. या निकालाने जिल्ह्यावर भाजपचे वर्चस्व सिद्ध झाले असून, शहरी मतदारांनी भाजपच्या बाजूने साथ दिली.

नगरपालिका निवडणुकांमुळे सातारा जिल्ह्यातील वातावरण गेल्या महिनाभरापासून ढवळून गेले होते. रविवारी जिल्ह्यातील 9 नगरपालिका व एक नगरपंचायतीचा फैसला झाला. साताऱ्यातील निवडणूक ना. शिवेंद्रराजे भोसले व खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांच्या मनोमीलनामुळे लक्षवेधक ठरली. यंदा प्रथमच त्यांनी भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवली. त्यामध्ये भाजपचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार अमोल मोहिते यांनी 57 हजार 587 मते मिळवत विरोधी राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या सुवर्णादेवी पाटील यांचा पराभव केला.

पाटील यांना 15 हजार 555 मते मिळाली. मोहिते यांचा तब्बल 42 हजार 32 मतांनी विजय झाला. या पालिकेत भाजपने नगराध्यक्षपदासह 41 जागा जिंकून निर्विवाद वर्चस्व मिळवले; मात्र 9 अपक्षांनीही आपला झेंडा रोवत भाजपला टक्कर देत विजयश्री खेचून आणली. तर शिवसेना शिंदे गटाने एका ठिकाणी विजय मिळवत चंचूप्रवेश केला. राजेंच्या बालेकिल्ल्यात मनोमीलनाच्या विरोधात जाऊन अपक्षांनी ऐतिहासिक मुसंडी मारली.

फलटण पालिकेवर 30 वर्षांपेक्षा जास्त प्रदीर्घ आणि निर्विवाद सत्ता असणाऱ्या विधानपरिषदेचे माजी सभापती आ. रामराजे नाईक-निंबाळकर यांना फलटण नगरीवरील आपली सत्ता गमवावी लागली. त्यांचे चिरंजीव ॲड. अनिकेतराजे नाईक-निंबाळकर यांना भाजपचे उमेदवार व माजी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांचे बंधू समशेरसिंह नाईक-निंबाळकर यांनी पराभवाची धूळ चारली. समशेरसिंह यांनी 600 मतांनी विजय मिळवला. या ठिकाणी भाजप व राष्ट्रवादी युतीने नगराध्यक्षपदासह 17 जागांवर विजय मिळवला. राजे गटाच्या नेतृत्वाखाली शिवसेनेला 7 जागी यश मिळाले. तर काँग्रेस 1, स्थानिक कृष्णा भीमा विकास आघाडी 1 आणि अपक्षांना 2 जागा मिळाल्या.

कराडमध्ये लोकशाही विकास आघाडी व यशवंत विकास आघाडीचे उमेदवार राजेंद्रसिंह यादव यांना कराडकरांनी जोरदार साथ दिली. त्यांनी 9 हजार 735 मताधिक्क्याने भाजपचे विनायक पावसकर यांचा पराभव केला. त्यांना 24 हजार 96 तर पावसकर यांना 14 हजार 361 मते मिळाली. या निवडणुकीत माजी मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या लोकशाही आघाडीला 13, भाजपला 10, यशवंत आघाडीला 8 तर अपक्ष 1 असे बलाबल मिळाले. या पराभवाने भाजपचे जिल्हाध्यक्ष आ. डॉ. अतुल भोसले यांना जोरदार धक्का बसला आहे.

वाई विधानसभा मतदारसंघावर ज्यांचे अनेक वर्षांचे वर्चस्व आहे त्या ना. मकरंद पाटील यांच्या प्रतिष्ठेला धक्का बसला. राष्ट्रवादीच्या चिन्हावर त्यांनी उभे केलेले सर्वाधिक 12 उमेदवार निवडून आले असले तरी नगराध्यक्षपदाचे उमेदवार डॉ. नितीन कदम यांना 2 हजार 159 मतांनी पराभव चाखावा लागला. वाईकरांनी भाजपचे अनिल सावंत यांना नगराध्यक्षपदावर विराजमान होण्याची संधी दिली. भाजपला येथे 10 जागा मिळाल्या. तर अपक्षानेही एका जागेवर विजय मिळवला. ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी ना. मकरंद पाटील यांचे पारंपरिक विरोधक माजी आमदार मदन भोसले यांना या निवडणुकीत मोठे बळ दिले.

महाबळेश्वरमध्ये राष्ट्रवादीचे सुनिल शिंदे यांनी अपक्ष उमेदवार कुमार शिंदे यांचा 1 हजार 458 मतांनी पराभव केला. मकरंद पाटील यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसने पहिल्यांदाच महाबळेश्वर पालिकेची सत्ता हस्तगत केली. या पालिकेत राष्ट्रवादी 14, कुमार शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना पुरस्कृत आघाडीचे 5, अपक्ष 1 व भाजप 1 असे उमेदवार विजयी झाले. कुमार शिंदे हे नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत पराभूत झाले असले तरी त्यांनी प्रभाग क्रमांक 4 मधून विजय मिळवत पालिकेत प्रवेश केला आहे.

म्हसवडकरांनी ना. जयकुमार गोरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवला. भाजपकडून नगराध्यक्षपदाच्या उमेदवार पूजा वीरकर या 4 हजार 844 मताधिक्क्याने निवडून आल्या. राष्ट्रवादीच्या भुवनेेश्वरी राजमाने यांना पराभवाला सामोरे जावे लागले. ना. जयकुमार गोरे यांच्या नेतृत्वाखालील भाजपने दोन्ही राष्ट्रवादींचा म्हसवडमध्ये व्हाईट वॉश दिला. ना. जयकुमार गोरे यांनी आपले वर्चस्व कायम ठेवत पुन्हा एकदा मोठ्या विजयाला गवसणी घातली.

रहिमतपूर पालिकेमध्ये भाजपविरोधात राष्ट्रवादी (अजित पवार गट), शिवसेना (शिंदे गट) युतीचा थेट सामना झाला. नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपच्या वैशाली निलेश माने या 55 मतांनी निवडून आल्या. नंदना सुनिल माने यांचा धक्कादायक पराभव झाला. मात्र रहिमतपुरकरांनी सुनिल माने यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवत युतीचे 11 नगरसेवक निवडून दिले. यामध्ये राष्ट्रवादीला 9, शिवसेनेला 2 जागांवर यश आले. मात्र, त्याचबरोबर आ. मनोजदादा घोरपडे, धैर्यशील कदम, चित्रलेखा माने, निलेश माने यांनी घातलेली सादही रहिमतपुरकरांनी स्वीकारुन भाजपचे 9 नगरसेवक निवडून दिले. सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी निलेश माने यांना चांगले सहकार्य केल्याने भाजपने ही निवडणूक जिंकली.

मलकापुरात आमदार डॉ. अतुल भोसले यांच्या नेतृत्वावर शहरवासियांनी विश्वास टाकला. याठिकाणी भाजपचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार तेजस सोनावले यांनी राष्ट्रवादीचे आर्यन कांबळे यांचा 5 हजार 277 मतांनी पराभव केला. येथे 19 जागा भाजपला, 2 जागा राष्ट्रवादी तर उध्दव बाळासाहेब ठाकरे गट 1 व अपक्ष 1 असे बलाबल राहिले.

पाचगणीत ना. मकरंद पाटील यांनी विशेष लक्ष घातले होते. राष्ट्रवादी पुरस्कृत 12 नगरसेवक व नगराध्यक्षपदाचे उमेदवार दिलीप बगाडे यांना निवडून देवून पाचगणीकरांनी ना. पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवला. इतर 8 अपक्षही या ठिकाणी निवडून आले.

मेढा नगरपंचायतीत भाजपच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार रुपाली वारागडे यांनी विजयश्री मिळवली. त्यांच्याविरोधातील शिवसेनेच्या उमेदवार रेश्मा करंजेकर यांचा 46 मतांनी पराभव झाला. भाजपने 11 जागा मिळवून नगरपंचायत ताब्यात घेतली आहे. तर शिवसेनेला 5 व राष्ट्रवादी शरद पवार गटाला एका जागेवर यश मिळाले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news