‘हर हर महादेव’ गर्जनेने दुमदुमला मुंगीघाट

कावडी सोहळ्याने शिखर शिंगणापूर यात्रेची सांगता : लाखो भाविकांची उपस्थिती
‘हर हर महादेव’ गर्जनेने दुमदुमला मुंगीघाट
File Photo
Published on
Updated on

शिखर शिंगणापूर : ‘हर हर महादेव’, ‘म्हाद्या धाव’चा गजर करत शिखर शिंगणापूर येथील शंभू महादेव यात्रेत बुधवारी मानाच्या कावडींनी मुंगीघाट सर केला. रखरखत्या उन्हात कावडी चढवताना शंभू महादेवाच्या जयघोषात मुंगीघाटाचा डोंगर दुमदुमून गेला. भक्तिशक्तीचा विराट सोहळा पाहण्यासाठी मुंगीघाट परिसरात लाखो भाविकांची उपस्थिती होती. रात्री उशिरा सासवड येथील भुतोजीबुवा तेली यांची मानाची कावड मुंगीघाटातून वर येताच लाखो भाविकांनी टाळ्यांचा गजर करत एकच जल्लोष केला. मानाच्या कावडीने शंभू महादेवाच्या पिंडीवर जलाभिषेक केल्यानंतर शिखर शिंगणापूर यात्रेची सांगता झाली.

लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या शिखर शिंगणापूर येथील शभू महादेवाच्या यात्रेस चैत्र शुद्ध पंचमीच्या दिवशी शिव-पार्वती हळदी सोहळ्याने प्रारंभ झाला, त्यानंतर अष्टमीच्या दिवशी शिव-पार्वती विवाहसोहळा संपन्न झाला. तसेच याच दिवशी शंभू महादेव मंदिर ते बळीच्या मंदिरास मानाचे पागोटे बांधण्याचा सोहळा मंगलमय वातावरणात पार पडला. दशमीच्या दिवशी धाराशिव जिल्ह्यातील भातांगळी येथील देवाची करवली असलेल्या मानाच्या काठीने शंभू महादेवाचे दर्शन घेतले. तर शुक्रवारी एकादशीच्या दिवशी लाखो शिवभक्तांनी एकादशीचा उपवास धरुन महादेवाचे दर्शन घेतले, तर सायंकाळी इंदोर राजघराण्यातील काळगावडे राजे यांनी घोड्यावरुन येऊन दर्शन घेतले.

शिंगणापूर यात्रेत कावड सोहळ्याला विशेष महत्त्व आहे. त्यामुळे शिंगणापूर यात्रा संपूर्ण महाराष्ट्रात कावड यात्रा म्हणून ओळखली जाते. बुधवारी द्वादशीच्या दिवशी सकाळपासूनच पुष्कर तलावातील जलतीर्थ घेऊन वाजतगाजत पायरी मार्गाने आलेल्या जवळपास एक हजारहून अधिक कावडींनी करुन जलाभिषेक करुन शंभू महादेवाचे दर्शन घेतले. याशिवाय सकाळपासूनच शिंगणापूर यात्रेचे मुख्य आकर्षण असलेल्या मुंगीघाटातील कावडी सोहळ्याचा थरार रंगला होता. सकाळी 11 वाजलेपासून फलटण, बारामती, इंदापूर, माळशिरस तालुक्यातील लहान-मोठ्या कावडी मुंगीघाटातून चढण्यास सुरुवात झाली. त्यानंतर 2 वाजल्यापासून सासवड पंचक्रोशीतील सासवड, खळद, शिवरी, बेलसर, एखतपूर, कुंभारवळण आदी ठिकाणच्या मानाच्या कावडी चढवण्यास प्रारंभ झाला. मुंगीघाट डोंगरावरुन मानवी हातांची साखळी करुन कावडी घेऊन चढवताना भाविकांचा उत्साह ओसंडून वाहत होता. ‘हरहर महादेव’, ‘म्हाद्या धाव’ अशी शिवगर्जना करत कावडीधारक भाविकांनी साहस, श्रद्धा आणि भक्तीशक्तीचे विराट दर्शन घडवून अवजड कावडी घेऊन चार टप्प्यात मुंगीघाट सर केला. रोमहर्षक व नेत्रदीपक असा कावड सोहळ्याचा थरार पाहण्यासाठी घाटमाथ्यावर उपस्थित असलेले लाखो शिवभक्त टाळ्यांचा गजर करत कावडी घेऊन येणार्‍या भाविकांचा उत्साह वाढवत होते. सायंकाळी साडेसातच्या सुमारास सासवड येथील कैलास काशिनाथ कावडे यांची मानाची कावड मुंगीघाटातून वर चढवण्यात आली. यावेळी उपस्थित असलेल्या लाखो भाविकांनी एकच जल्लोष केला. डोंगर माथ्यावर कावड आल्यानंतर कावडीधारक भाविकांनी ढोलताशांच्या गजरात, गुलालाची उधळण करत, हरहर महादेव शिवगर्जना करत, फटाक्यांच्या आतषबाजीत, कावडी नाचवून आनंद व्यक्त केला.

यावेळी सातारा जिल्हा प्रशासनाच्यावतीने प्रांताधिकारी उज्ज्वला गाडेकर, पोलिस उपअधीक्षक अश्विनी शेंडगे, सपोनि दत्तात्रय दराडे, तहसीलदार विकास अहिर, गटविकास अधिकारी प्रदीप शेंडगे, शिंगणापूर सरपंच अनघा बडवे, उपसरपंच राजू पिसे, देवस्थानचे व्यवस्थापक मंदार पत्की यांनी मानाच्या कावडींचे स्वागत केले. सर्व कावडी मंदिराकडे वाजत-गाजत गेल्यानंतर भुतोजीबुवा तेली यांच्या कावडीने शंभू महादेवाच्या पिंडीवर जलाभिषेक केल्यानंतर शिंगणापूर यात्रेची सांगता झाली. कावडी सोहळ्याचा थरार पाहण्यासाठी मराठवाडा, विदर्भ, खानदेशसह पश्चिम महाराष्ट्रातील लाखो भाविक शिंगणापूरनगरीत दाखल झाले होते. शिंगणापूर यात्रेसाठी प्रशासकीय यंत्रणा, पोलिस प्रशासन, आपत्ती व्यवस्थापन विभाग, शिंगणापूर ग्रामपंचायत व देवस्थान समिती यांनी नेटकेपणाने नियोजन करुन भाविकांना सर्व प्रकारच्या सोयीसुविधा उपलब्ध करुन दिल्या.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news