

सातारा : सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये सहकार चळवळ मजबूत आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी संघाच्या वतीने सहकार क्षेत्र आणखी वेगाने पुढे नेण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. विदर्भ, मराठवाड्यात काही प्रमाणात सहकार चळवळीला घरघर लागली आहे. अशा परिस्थितीत संपूर्ण महाराष्ट्रातील सहकार मजबूत करण्यासाठी साताऱ्यानेच पुढाकार घ्यावा. सहकारात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांसाठी आम्ही मुंबईत सहकार भवन उभारणार आहोत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आम्हाला ताकद दिली आहे. मुंबईतील सायन येथे भूखंड देऊन त्यांनी सहकार भवनाचे भूमिपूजनही केले असून दोन वर्षात हक्काचे सहकार भवन मुंबईत उभे राहणार आहे, असा विश्वास महाराष्ट्र राज्य सहकारी संघाचे अध्यक्ष आ. प्रवीण दरेकर यांनी व्यक्त केला.
महाराष्ट्र राज्य सहकारी संघ लिमिटेड पुणेच्या विद्यमाने सातारा जिल्हा सहकारी बोर्ड, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक व जिल्हा उपनिबंधक सहकारी कार्यालय यांच्या सहकार्याने अद्ययावत सहकार प्रशिक्षण सभागृह व सहकारी संस्था कार्यकर्ता चर्चासत्राच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले, जिल्हा बँकेचे अध्यक्ष खा. नितीन पाटील, उपाध्यक्ष अनिल देसाई, संचालक सुनील खत्री, कांचन साळुंखे, राज्य सहकारी संघाचे संचालक धनंजय शेडगे, नंदकुमार काटकर, सातारा जिल्हा सहकार बोर्डाचे अध्यक्ष जितेंद्र जगदाळे, उपाध्यक्ष संजीव साळुंखे, संचालक शाहूराज फाळके, वनिता गोरे, जिल्हा उपनिबंधक संजयकुमार सुद्रिक, जिल्हा विशेष लेखापरीक्षक वर्ग 1 श्रीधर कोल्हापुरे उपस्थित होते.
दरेकर म्हणाले, पश्चिम महाराष्ट्र हे सहकाराचे प्रमुख केंद्र आहे. यशवंतराव चव्हाण, विलासकाका पाटील, अभयसिंहराजे भोसले अशा अनेक दिग्गजांनी साताऱ्याच्या सहकार चळवळीला योग्य दिशा दिली आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना जिल्हा बँकेने ताकद दिली आहे. जिल्ह्यातील सहकारी संस्थांना जिल्हा बँकेची मोठी मदत आहे. सध्याच्या घडीला विदर्भ आणि मराठवाड्यातील बँका डबघाईला आल्या आहेत. सातारा जिल्हा बँकेचे काम खा. नितीन पाटील यांच्या नेतृत्वाखाली प्रभावीपणे सुरू आहे. आता विदर्भ मराठवाड्यातील सहकारी संस्था यांना ऊर्जितावस्था आणण्यासाठी त्यांनीच पुढाकार घ्यावा.
शिवेंद्रराजे भोसले म्हणाले, यशवंतराव चव्हाण, विलासकाका पाटील, अभयसिंहराजे भोसले यांच्या सारख्या सहकार चळवळीतील नेत्यांनी प्रामाणिकपणे प्रयत्न केल्यामुळेच जिल्ह्यातील सहकार चळवळ मजबूत झाली व ती सर्वसामान्यपर्यंत पोहोचली. आपल्यापुढे अनेक अडचणी आहेत. त्यावर मात करून नक्की पुढे जाऊ.
खा. नितीन पाटील म्हणाले, सहकारात अडचणींना तोंड द्यावे लागते. त्यातून तोडगा काढण्याचे काम नेतेमंडळी करत असतात. अजितदादा पवार यांचा सहकारातील अभ्यास होता. त्यांच्या निधनानंतर सहकारात पोकळी निर्माण झाली होती. मात्र ना. भोसले आणि दरेकर यांच्या माध्यमातून ही पोकळी भरून निघाली, असे मला वाटते.