

शिरवळ : शिरवळ येथे नवीन मोबाईल शॉपीसाठी मोबाईल पाहिजे, असे सांगून दिशाभूल करत मुंबईतील मोबाईल शॉप व्यावसायिकाला गंडा घातल्याचे समोर आले आहे. संशयिताने चहा पिण्याच्या बहाण्याने 5 लाख 41 हजारांचे 87 मोबाईल लंपास केले. शिरवळ पोलिसांनी बारा तासांत चोरट्याचा छडा लावला. मदन केशव शर्मा (वय 44, रा. जोगेश्वरी, पश्चिम मुंबई, सध्या रा. वडजल, ता. फलटण) असे संशयिताचे नाव आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शर्मा याने दोन महिन्यांपूर्वी मस्जिद बंदर मुंबई येथील अश्रफी मोबाईल शॉपमध्ये वारंवार मोबाईलची खरेदी करत मोबाईल व्यवसायिकाचा विश्वास संपादन केला. याचाच फायदा घेत त्याने मला शिरवळमध्ये मोबाईलचे दुकान टाकायचे आहे, असे सांगत मुंबई येथील मोबाईल व्यावसायिक जावेद शेख यांना दि.12 रोजी सोबत घेऊन शिरवळला आला.
शिरवळमधील हॉटेलात जावेद शेख यांना चहाचे कुपन काढण्यासाठी पाठवले व सोबत असलेले 5 लाख 41 हजार 150 रुपयांचे 87 मोबाईल असणारी बॅग घेऊन पसार झाला. चोरी झाल्याचे समजतात शेख यांनी तत्काळ शिरवळ पोलिसांना याबाबतची माहिती दिली. पोनि यशवंत नलावडे यांनी तपासाची चक्रे गतिमान करत सपोनि कीर्ती मस्के यांना सूचना करत गुन्हे शाखेच्या पथकांना तपासासाठी रवाना केले. यावेळी तांत्रिक माहिती व गोपनीय माहितीदाराच्या आधारे सातार्यातून मदन शर्मा याला 87 मोबाईलसह ताब्यात घेतले. ही कारवाई पोनि यशवंत नलावडे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि कीर्ती म्हस्के, पोलिस अंमलदार सचिन वीर, प्रशांत धुमाळ, सचिन फाळके, अजित बोराटे, सुरज चव्हाण, अक्षय बगाड, दीपक पालेपवाड, मंगेश मोझर यांनी केली.