

नवी दिल्ली/ठाणे : मुंबईमध्ये 2003 मध्ये झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणाचा मुख्य सूत्रधार आणि इसिस या दहशतवादी संघटनेचा महाराष्ट्रातील म्होरक्या साकिब नाचण याचा शनिवारी दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयात ब्रेन हॅमरेजमुळे मृत्यू झाला आहे. दरम्यान, खबरदारीचा उपाय म्हणून साकिबच्या मृत्यूनंतर ठाणे जिल्ह्यातील पडघा येथे त्याच्या घराच्या परिसरात पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.
तो 2023 पासून तिहार तुरुंगात होता. काही दिवसांपूर्वी त्याला दीनदयाळ रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. नंतर त्याला सफदरजंग रुग्णालयात दाखल करण्यात आले. शनिवारी सकाळी त्याची प्रकृती आणखी बिघडली. रुग्णालयातील अधिकार्यांनी दिलेल्या माहितीनुसार, दुपारी 12.10 वाजता त्याला मृत घोषित करण्यात आले.
ठाणे जिल्ह्याच्या भिवंडी तालुक्यातील पडघा भागात नाचण याला राष्ट्रीय तपास संस्थेने 2023 मध्ये अटक केली होते. बंदी घालण्यात आलेल्या स्टुडंटस् इस्लामिक मूव्हमेंट ऑफ इंडिया (सिमी)चा तो माजी सदस्य होता. मुंबईतील बॉम्बस्फोटांमध्ये सहभागी असल्याबद्दल त्याला दोषी ठरवण्यात आले होते. जून 2024 च्या सुरुवातीला, राष्ट्रीय तपास संस्थेने दिल्ली आणि महाराष्ट्रातील पडघा दहशतवादी मॉड्यूल प्रकरणात त्याच्यावर आरोपपत्र दाखल केले होते. दहशतवादासाठी तरुणांची भरती, कट्टरतावाद आणि स्फोटके तयार करण्याच्या कटात त्याच्यासह 16 दहशतवाद्यांवर आरोपपत्र दाखल केले होते. स्फोटके तयार करण्याशी संबंधित डिजिटल फाइल्स तरुणांना तो शेअर करत असल्याचे तपासात उघड झाले होते.
भारतात हिंसाचार पसरवण्यासाठी आणि लोकशाही व्यवस्था नष्ट करण्यासाठी इसिसच्या अजेंड्याचा भाग म्हणून दहशतवादासाठी तो निधी उभारत असल्याचेही स्पष्ट झाले होते. दरम्यान, कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी साकिबचे घर असलेल्या पडघा गावात दोनशेहून अधिक पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, गावात येणार्या प्रत्येक वाहनाची तपासणी पोलिसांनी सुरू केली आहे.