मसूर : शामगाव येथील शिवारात चार दिवसांपासून बिबट्याचे दर्शन होत होते. शुक्रवारी पहाटे बिबट्याच्या हल्ल्यात खेचर घोडी ठार झाल्याने शामगावचे ग्रामस्थ भयभीत झाले आहेत.
पुसेसावळी कराड रस्त्यानजिक इनाम नावाच्या शिवारात शेतकरी युवराज पोळ यांच्या शेतात शेत खतवण्यासाठी सदाशिव हरके (रा. अक्कोळ, ता. निपाणी, जि. बेळगाव) यांच्या मेंढ्या बसल्या होत्या. शुक्रवारी पहाटेच्या सुमारास त्यांच्या खेचर घोडीवर बिबट्याने हल्ला केल्याचे हरके यांच्या लक्षात आले. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या या घोडीचा शनिवारी सकाळी सहा वाजता मृत्यू झाला.
या घटनेची माहिती हरके यांनी गावात ही माहिती दिली. यानंतर वनरक्षक शीतल पाटील, सानिका घाडगे, सरपंच विजय पाटोळे, पशू वैद्यकीय अधिकारी डॉ. राहुल धोंगडे, जगन्नाथ मोरे, शेतकरी अधिकराव पोळ यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थीतीची पाहणी केली. तसेच घटनेचा पंचनामा केला. बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे. दरम्यान, या कराडसह पाटण तालुक्यात अनेक गावांमध्ये बिबट्याचा वावर मोठ्या प्रमाणात आढळून येत आहे. त्यामुळे नागरीकांमध्ये भितीचे वातावरण आहे.