

सातारा : गेल्या सात-आठ महिन्यांपासून प्रकृती अस्वस्थामुळे राजकीय जीवनापासून दूर असलेले खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी आजारपणातून सावरताच जोरदार मुसंडी मारली आहे. साताऱ्यातील विविध कार्यक्रमानंतर त्यांनी मुंबईत जाऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह चार मंत्र्यांच्या भेटी घेतल्या. त्यांनी मंत्र्यांसोबत विविध विषयांवर चर्चा केली.
साताऱ्यात झालेल्या प्रधानमंत्री आवास योजनेच्या लोकार्पण सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत खा. उदयनराजे भोसले हे व्यासपीठावर दिसले होते. तसेच भुईंज येथील कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेत त्यांनी खांबाटकी बोगद्याच्या विकासाबाबत चर्चा केली होती. आता मंत्री महोदयांच्या एकापाठोपाठ भेटीमुळे उदयनराजेंनी राजकीय क्षेत्रात जोरदार कमबॅक केल्याचे दिसत आहे.
आजारपणानंतर खा. उदयनराजेंनी मुंबईत जाऊन मंत्रालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, मंत्री दादा भुसे यांची भेट घेतली. उदयनराजे यांनी सातारा जिल्ह्यासाठी आक्रमक पाठपुरावा सुरू केल्याचे दिसत आहे. पुन्हा फुल फॉर्ममध्ये आलेले उदयनराजे साताऱ्यासाठी काय घेऊन येतात, याकडे जिल्ह्यातील जनतेचे लक्ष लागले आहे. यावेळी जि.प. चे माजी सभापती सुनील काटकर, किल्ले प्रतापगड प्राधिकरणाचे सदस्य काका धुमाळ, ॲड. विनीत पाटील आदि उपस्थित होते.
शिवेंद्रराजेंशीही भेटून चर्चा
खा. उदयनराजे यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. शिवेंद्रराजे भोसले यांची मुंबईत त्यांच्या निवासस्थानी जावून विविध विषयांवर चर्चा केली. सातारा नगरपालिकेत दोन आघाड्यांमधील पदाधिकाऱ्यांमध्ये झालेल्या वादावादीनंतर शिवेंद्रराजेंनी बैठक घेवून नगरसेवकांना झापडले होते. तर उदयनराजेंनीही बैठक घेवून संताप व्यक्त केला होता. त्यानंतर दोन्ही राजेंची एकमेकांना समजून घेवून काम करण्याची पद्धतही समोर आली होती. उदयनराजेंनी मुंबईत जावून शिवेंद्रराजेंशीही गप्पा मारल्या. या भेटीचा शिवेंद्रराजेंनीही आनंद व्यक्त केला.