

सातारा : माझ्या पोटात असतं... तेच माझ्या ओठात असतं. जे योग्य आहे, तेच मी योग्य म्हणत असतो, माझी प्रकृती बरी नव्हती त्यामुळेच मी आरक्षणाच्या ठिकाणी नव्हतो, ही वस्तुस्थिती आहे. याआधी मी अंतरवालीला गेलो होतो. शासनाने आंदोलनावर तोडगा काढावा, यासाठी सातत्याने माझा पाठपुरावा सुरू होता, अशी माहिती खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली.
खा. श्री. छ. उदयनराजे भोसले म्हणाले, माझी प्रकृती काही दिवसांपासून बरी नव्हती. मला कालच डिस्चार्ज मिळालाय. यामुळे मी जरांगे यांच्या आंदोलनस्थळी जाऊ शकलो नाही, माध्यमांमार्फत मुख्यमंत्री यांना तोडगा काढण्याच्या द़ृष्टीने आवाहन केले होते. मनोज जरांगे आणि त्यांच्यासोबत आंदोलनासाठी बसलेल्या मराठा बांधवांवर त्यांची कुटुंबे अवलंबून आहेत. त्यामुळे त्यांनी तब्येतीची काळजी घ्यावी, असा माझा प्रयत्न होता. दरम्यान, प्रत्येक विषयात राजकारण आणणं ही घातक प्रवृत्ती आहे. धर्म, जात, समाज कोणताही असो, मोठ्या विचारांनी, सकारात्मक विचारांनी पुढं गेलं पाहिजे, असेही उदयनराजे म्हणाले.
भाजपचे हस्तक असल्याची टीका खा. संजय राऊत यांनी केली होती. या विधानाचा उदयनराजेंनी चांगलाच समाचार घेतला. ‘मला कोणाचं नाव घेऊन त्यांना मोठं करायचं नाही, संपूर्ण महाराष्ट्र जाणतो की, माझ्या मनात जे असतं तेच माझ्या ओठावर असतं. मला सवंग प्रसिद्धी घ्यायची नसते. जर कोणी मला भाजपचं हस्तक म्हणत असेल, तर ते त्यांच्या संकुचित बुद्धीचं लक्षण आहे. मला त्यांना नाव घेऊन मोठं करायचं नाही. देव त्यांना सद्बुद्धी देवो हीच प्रार्थना.’