

पिंपोडे बुद्रुक : कोरेगाव तालुक्याचा उत्तर भाग हा दुष्काळी भाग आहे. येथील विकासकामे आजी-माजी लोकप्रतिनिधींच्या नाकर्तेपणामुळे रखडली आहेत. ही रखडलेली विकासकामे मार्गी लावू. पाणीप्रश्नाबाबत उपाययोजनेकामी लवकरच सातारा येथे जलसंपदा खात्याच्या अधिकार्यांच्या बरोबर बैठक लावणार असल्याची ग्वाही खा. धैर्यशील मोहिते-पाटील यांनी दिली.
खा. मोहिते-पाटील यांनी गुरूवारी सोनके, वाघोली व पिंपोडे बुद्रुक या गावांना भेटी देऊन ग्रामस्थ व कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी माजी.जि.प.सदस्य सतीश धुमाळ, उपसभापती संजय साळुंखे, जितेंद्र जगताप, संभाजी धुमाळ,विजयराव धुमाळ,प्रताप पवार उपस्थित होते.
खा. मोहिते-पाटील म्हणाले, वसना-वंगणा योजनेच्या पाण्याचे नियोजन करून ते शेतकर्यांना कसे देता येईल, यासाठी प्रयत्न करणार आहे. पोलीस खात्यातील राजकीय नेत्यांच्या हस्तक्षेपामुळे पोलीस यंत्रणा दबावात काम करीत आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांची घुसमट होत असल्याची तक्रार यावेळी खासदार मोहिते-पाटील यांच्याकडे कार्यकर्त्यांनी केली.त्यावर लवकरच सातारा पोलीस अधिक्षक तुषार दोषी यांच्याशी चर्चा करून करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच पाणीप्रश्नाबाबत माजी आ.दिपक चव्हाण,जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजीवराजे ना. निंबाळकर यांना सोबत घेऊन जलसंपदा खात्याच्या अधिकार्यांबरोबर बैठक लावण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.