

सातारा : सातारा जिल्ह्यातील 1 हजार 500 ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाच्या आरक्षणाची सोडत निघाली आहे. तालुकानिहाय सरपंदपदाच्या आरक्षणाचे आकडे समोर आल्याने प्रत्येक गावात राजकीय हालचालींना वेग आला आहे. मनासारखेच आरक्षण पडावे, यासाठी इच्छुकांनी देव पाण्यात घातले आहेत. आकडेवारी समोर आली तरी आपल्या गावात कोणते आरक्षण पडणार याची उत्सुकता लागून राहिली आहे.
सरपंचपदाचा आरक्षण कोटा जाहीर झाल्यानंतर ग्रामीण भागात राजकीय हालचालींना गती आली आहे. अनेक इच्छुक उमेदवार, संभाव्य पॅनेल प्रमुख, स्थानिक नेतृत्व आपापल्या गावातील स्थिती समजून उमेदवारीसाठी तयारीला लागले आहेत. काहीजणांनी गाठभेटी वाढवायला सुरूवात केली आहे. उमेदवारांची चाचपणी सुरू झाली आहे. काही इच्छुक गाव नेत्यांच्या संपर्कात राहू लागले आहेत. तालुका नेत्यांकडेही गाठभेटी सुरू झाल्या आहेत. त्यामुळे ग्रामीण राजकारणात प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हालचालींना वेग आला आहे. या सरपंचपदाच्या आरक्षणामुळे या निर्णय प्रक्रियेत विविध प्रवर्गातील नागरिकांनाही सहभागी होता येणार आहे. यामुळे केवळ सत्ताच नव्हे, तर सामाजिक विकासाची संधीही यानिमित्ताने उपलब्ध होणार आहे.
अलिकडच्या काळात सरकारने ग्रामीण भागात विकेंद्रीकरणाचे धोरण राबवल्यामुळे गावची सूत्र आपल्याकडेच रहावीत यासाठी मोर्चेबांधणी केली जाऊ लागली आहे. त्यामुळे तालुका किंवा जिल्हास्तरावरील निवडणुका लढण्यापेक्षा गावच्याच राजकारणात अनेकांना ‘रस’ वाटू लागला आहे. गाव म्हणजे मर्यादित व आवाक्यातील मतदारसंघ असल्यामुळे अनेकजण सरपंचपदासाठी उतावीळ असतात. जिल्ह्यात काही ग्रामपंचायती या नगरपंचायतीच्या तोडीच्या आहेत. त्यामुळे अशा गावचा सरपंच म्हणून मिरवण्याची काहीजणांना भारी हौस असते. आता सरपंचपदाच्या आरक्षण कोट्यामुळे ग्रामीण भागाचे नेतृत्व करण्याची सर्वसामान्यांना संधी उपलब्ध झाली आहे. विशेषत: मागासवर्गीय व महिलांना मिळणारे प्रतिनिधीत्व हे सामाजिक समतेच्या दिशेने टाकलेले ठोस पाऊल मानले जाते.
ग्रामपंचायती म्हणजे केवळ सत्ता नव्हे तर तो विकासाचा मूळ गाभा असतो. अशा नेतृत्वांकडून गावचा सर्वांगिण विकास घडण्यास मदत होत असते. सरपंच पदाच्या आरक्षण सोडतीनंतरच गावातील राजकीय गणिते बदलणार आहेत. त्यानंतरच गावोगावी ग्रामपंचायतीचं धुमशान रंगणार आहे.
ग्रामीण भागात सरपंच पद प्रतिष्ठेचे
ग्रामीण भागातील आणि कार्यकर्त्यांची निवडणूक म्हणून ग्रामपंचायतीच्या निवडणूकीकडे पाहिले जाते. गावचे मिनीमंत्रालय म्हणून ग्रामपंचायतीचा नावलौकिक आहे. ग्रामीण भागात सरपंच पद हे मानाचे व प्रतिष्ठेचे पद मानले जात असल्याने सर्वच राजकीय पक्ष ग्रामपंचायत निवडणूकीत आपल्या कार्यकर्त्यांचे नशीब अजमावण्यासाठी तयारी करून घेत असतात.