

नागठाणे : नागठाणे (ता.सातारा) येथून चोरीस गेलेल्या मोटारसायकलचा तपास करत असता बोरगाव पोलिसांनी अतीत (ता.सातारा) येथून 2 संशयितांना ताब्यात घेऊन त्याच्याकडून सुमारे 4 लाख 95 हजाराच्या एकूण 7 मोटारसायकली हस्तगत केल्या.
याप्रकरणी संभाजी बबन जाधव (वय 41, रा. अतीत) व दीपक उर्फ गोट्या तानाजी मोहिते (वय 34, रा. नागठाणे) या दोघांवर बोरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नागठाणे परिसरातून चोरीस गेलेल्या मोटारसायकलचा तपास करत असता बोरगाव पोलीस स्टेशनचे सपोनि रवींद्र तेलतुंबडे व डी. बी. पथकाला काही धागेदोरे मिळाले. चोरीची मोटारसायकल घेऊन दोघे जण सातार्याहून अतीत येथे येणार असल्याची माहिती मिळाली. यावेळी बोरगाव पोलिसांना अतीत येथील महामार्गाच्या कडेला असलेल्या सर्व्हीस रस्त्यालगत दोघे संशयित दुचाकीवर बसलेले दिसले. बोरगाव पोलिसांच्या डीबी पथकाने चौकशी केली. यावेळी त्यांनी ती मोटारसायकल चोरीची असल्याचे कबूल केले व आणखी 6 मोटारसायकली त्यांनी सातारा व कोल्हापूर परिसरातून चोरून आणून अतीत येथे ठेवल्याचे सांगितले. या सर्व 7 मोटारसायकली पोलिसांनी हस्तगत केल्या.
ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर, डीवायएसपी राजीव नवले, सपोनि रवींद्र तेलतुंबडे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पो.ना. प्रशांत चव्हाण, अतुल कणसे, विशाल जाधव, अमोल गवळी यांनी केली.