Ashadhi Wari 2025 | माऊलींच्या दर्शनासाठी रांगांची संख्या वाढवणार : एसपी तुषार दोशी

यावर्षी लोणंदला एकच मुक्काम
Ashadhi Wari 2025 |
नीरा नदीवरील दत्तघाटाची पाहणी करून एसपी तुषार दोशी यांनी अधिकार्‍यांशी चर्चा केली.Pudhari Photo
Published on
Updated on

लोणंद : श्री संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा सुखकरपणे पार पाडण्यासाठी पोलिस यंत्रणेच्या मार्फत नियोजन करण्यात येत आहे. यावर्षी माऊलींचा लोणंद नगरीत एकच मुक्काम असल्याने भाविकांची वाढती संख्या लक्षात घेवून दर्शनासाठीच्या रांगाची संख्या वाढवण्याचे नियोजन केले जाणार आहे. दर्शन रांगा शहराऐवजी शहराच्या बाहेरून कशा प्रकारे नेण्यात येईल, याचे नियोजन केले जात असल्याची माहिती पोलिस अधीक्षक तुषार दोशी यांनी दिली.

श्री संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा जिल्ह्यातील चार मुक्कामासाठी दि 26 जून रोजी येत आहे. यातील एक मुक्काम लोणंदमध्ये होत आहे. या पार्श्वभूमीवर नीरा नदी दत्तघाट व पालखीतळाला एसपी तुषार दोशी यांनी भेट दिली. यावेळी ते बोलत होते. यावेळी डीवायएसपी राहुल धस, सपोनि सुशील भोसले, नगराध्यक्ष मधुमती गालिंदे, उपनगराध्यक्ष गणीभाई कच्छी , मुख्याधिकारी दत्तात्रय गायकवाड, नगरसेवक शिवाजीराव शेळके, रवींद्र क्षीरसागर, सुप्रिया शेळके, सागर शेळके, भरत बोडरे, सागर गालिंदे, संदीप शेळके, लक्ष्मणराव शेळके, अ‍ॅड .गजेंद्र मुसळे, अ‍ॅड. बबलू मणेर, अ‍ॅड. गणेश शेळके, ऑफीस अधिक्षक शंकरराव शेळके, सुनिल यादव, सुनिल शहा यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

माऊलींचा पालखी सोहळा लोणंद मुक्कामी असताना या ठिकाणी भाविकांच्या दर्शनासाठी लांबच-लांब रांगा लागत असतात. लोणंद शहरातून पालखीतळ ते शास्त्री चौक, शिरवळ चौक, श्रीराम बाजारपर्यंत सुमारे दिड ते दोन किलोमीटर लांब भाविकांच्या रांगा लागतात. या दरम्यान नवी पेठ येथील गांधी चौक या ठिकाणी भाविकांची मोठी गर्दी होते. त्या ठिकाणी रेटा-रेटी धक्काबुक्की होत असते. या ठिकाणची भाविकांची गर्दी व गोंधळ रोखण्यासाठी नवी पेठ येथून जाणार्‍या रांगे ऐवजी निंबोडी रोड, वेताळ पेठ, दुर्गामाता मंदिर मार्गे सातारा रोड या मार्गावर दर्शन रांग घेण्याचे नियोजन करण्याबाबत चर्चा यावेळी करण्यात आली.

यावेळी तुषार दोशी म्हणाले, माऊलींचा पालखीस सोहळा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी नियोजन केले जात आहे. दर्शन रांगासंदर्भात लवकर जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्यासमवेत पाहणी केल्यानंतर निर्णय घेतला जाईल. माऊलींच्या पालखी सोहळ्यावर असलेल्या दिंड्यांना योग्य ते प्रकारचे संरक्षण व वाहतूक व्यवस्थेसाठी बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. निरा नदीच्या दत्तघाटावरही बॅरिकेटींग होणार आहे, असेही ते म्हणाले. यावेळी विविध खात्यांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. लोणंद पालखी तळाची पाहणी करताना एसपी तुषार दोशी, नगराध्यक्ष मधुमती गालिंदे, गणीभाई कच्छी, डीवायएसपी राहुल धस व इतर.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news