

सातारा : सध्या मान्सूनपूर्व पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहेत. तसेच पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर सातारा जिल्हा परिषदेची आरोग्य यंत्रणा अलर्ट झाली आहे. जिल्हा, तालुका व प्राथमिक आरोग्य केंद्रावर नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. तर सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांना पुरेसा औषधसाठा उपलब्ध करुन देण्यात आला आहे.
पावसाळ्यात जलजन्य व किटकजन्य आजारांपासून साथ पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यासाठी आरोग्य विभागाने सातारा जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत कार्यरत सर्व उपकेंद्रामधील आरोग्य कर्मचार्यांचे पावसाळ्यातील पूर्ण नियोजन करण्यात आले आहे. तसेच त्यांना आवश्यक त्या सूचनाही आरोग्य विभागामार्फत देण्यात आल्या आहेत. सर्व भागातील पाणी पुरवठा करण्यात येत असलेल्या योजनांचे सर्वेक्षण करून एखाद्या ठिकाणी जलवाहिनीला गळती किंवा व्हॉल्वला गळती असल्यास त्याबाबत संबंधित ग्रामपंचायतींना लेखी पत्र देवून त्या बंद करण्याबाबतची कार्यवाही करण्यात येत आहे.
हिवताप, डेंग्यू, चिकुनगुन्याबाबतचे सर्व सर्वेक्षण करण्यात आले आहे. डास उत्पत्ती स्थाने नष्ट करण्यात आली आहेत. आरोग्य विभाग व ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने हिवताप जनजागरण पंधरवडा राबवण्यात येणार आहे. सर्व्हेक्षणामध्ये गावातील सर्व विहिरी पाण्याची साठवण टाकी, गटारातून गेलेले नळ याठिकाणची ओटी टेस्ट घेण्यात यावी. सर्व पाणी उदभवाचे पाणी नमुने तपासणीकरता घेण्यात यावेत. सर्वेक्षणाच्यावेळी ग्रामपंचायतीमार्फत गटारे वाहती करावीत. पिण्याच्या पाण्याच्या टाकीचा व विहिरीच्या परिसराची स्वच्छता करावी.
ग्रामपंचायतीकडे असणारी पाणी शुध्दीकरणासाठी लागणार्या टीसीएलची साठवणूक योग्य आहे का? याची पाहणी करून योग्य ती उपाययोजना करण्यात यावी. एखाद्या ठिकाणी आरोग्याशी संबंधित किंवा आकस्मीत घटना घडली तर त्याबाबत जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.