

वाई : वाई-सातारा वन विभागाने वन्यजीव तस्करीविरोधात कारवाई करत घोरपडीच्या अवयवांची अवैध विक्री करणाऱ्या दोन संशयितांना अटक केली. या कारवाईत घोरपडीचे अवयव, वाघ अथवा बिबट्यासदृश प्राण्याचे नख, ‘हत्ताजोडी’ म्हणून ओळखले जाणारे नर घोरपडीचे जननेंद्रिय तसेच समुद्री वन्यजीवांशी संबंधित ‘इंद्रजाल’ असा मुद्देमाल जप्त केला. न्यायालयाने संशयितांना 3 दिवसांची वनकोठडी सुनावली.
वनपरिक्षेत्र अधिकारी (संरक्षण व अतिक्रमण निर्मूलन) यांना 23 मे रोजी गुप्त माहिती मिळाल्यानंतर वाई वनपरिक्षेत्रातील कर्मचारी आणि फिरते पथकाने सापळा रचला. सायं. सुमारे 6.15 वाजण्याच्या सुमारास वाई ते मांढरे मार्गावरील कोचळेवाडी गावाजवळील हॉटेल विक्रांत परिसरात ही कारवाई केली. यावेळी महेश सूर्यकांत व्होनफडे (वय 26, रा. तांबवे, ता. माळशिरस, जि. सोलापूर) आणि रोहन गजानन कदम ( 23, रा. तांबवे भवानीनगर, पो. माळीनगर अकलूज, ता. माळशिरस) यांना मोटारीसह (क्र. एमएच 14 एचडब्ल्यू 0506) वाहनासह ताब्यात घेतले .
वाहनाची तपासणी केली असता घोरपडीच्या मानेपासून तोंडापर्यंतचा अवयव, नर घोरपडीचे चार अवयव (हत्ताजोडी), वाघ-बिबट्यासदृश प्राण्याचे नख तसेच समुद्री वन्यजीवाशी संबंधित ‘इंद्रजाल’ असा मुद्देमाल आढळला. याशिवाय आरोपींकडून 15 हजार रुपयांची रोकड, दोन मोबाईल फोन आणि तस्करीसाठी वापरलेले वाहन जप्त केले. या प्रकरणी संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल झाला संशयितांना प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी (वाई) यांच्या न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना 3 दिवसांची वनकोठडी सुनावली.
ही कारवाई उपवनसंरक्षक अमोल सातपुते, विभागीय वनाधिकारी (दक्षता) कोल्हापूर संजय वाघमोडे आणि सहायक वनसंरक्षक (वनीकरण) प्रदीप रोंधळ यांच्या मार्गदर्शनाखाली झाली. कारवाईत वनपरिक्षेत्र अधिकारी गणेश महांगडे, वनपाल संग्राम मोरे, वनपाल धोंडीबा बोडके तसेच वाई वनपरिक्षेत्र व फिरते पथकातील अधिकारी-कर्मचारी सहभागी झाले होते.