सातारा : पुढारी वृत्तसेवा
पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहनधारक मेटाकुटीला आले आहेत. तसेच महामार्गाची चाळण झाल्याने दै. ‘पुढारी’ने परखड वृत्त प्रसिध्द करून याला वाचा फोडली होती. अखेर याची महामार्ग प्राधिकरणाने दखल घेतली आहे. प्राधिकरणाकडून खड्डे मुजवण्यासाठी जिओ पॉलिमर काँक्रीट या अत्याधुनिक यंत्रणेचा वापर करण्यात आला आहे. हा दीर्घकालीन उपाय ठरणार आहे.
महामार्गावर शिरवळ ते शेंद्रे दरम्यान यंदाच्या पावसाळ्यात मोठे खड्डे पडले. याबाबत दै. पुढारीने वेळोवेळी आवाज उठवला होता. याची दखल घेऊन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई-गोवा महामार्गावर ज्या पध्दतीने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून खड्डे मुजवले जात आहेत. त्याचपध्दतीने सातारा-पुणे मार्गावरही रस्ते मुजवावेत, असे आदेश दिले होते. थेट मुख्यमंत्र्यांनी आदेश दिल्यानंतर प्राधिकरण खडबडून जागे झाले. प्राधिकरणाकडून खड्डे मुजवण्यास सुरूवात झाली आहे. पाऊस उघडल्यावर हॉटमिक्सने आणि भरपावसात कोल्डमिक्सने खड्डे भरले जातात. परंतु, काही ठिकाणी वारंवार खड्डे पडत आहेत. या पार्श्वभूमीवर जिओपॉलिमर काँक्रीट या नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून खड्डे भरण्याचे काम सुरू झाले आहे.पहिल्या टप्प्यात जेथे पुन्हा पुन्हा खड्डे होतात तेथे याचा वापर केला जात आहे.
सिमेंट, रेड सेंड, दहा मिलिमीटर ग्रीगेट जिओपोलिमर केमिकल याच्या मिश्रणातून हे काँक्रीट तयार केले जाते. यासाठी सिमेंट क्युरिंगची गरज भासत नाही. हे काँक्रीट डांबर व काँक्रीट रस्त्याला चालते. हे मटेरियल टिकाऊ असून खड्डा भरल्यानंतर दोन तासांत वाहतूक सुरू केली जाऊ शकते.