

परळी : परळी विभागाला साजेशा अशा अत्याधुनिक स्टेडियमची गरज आहे आणि ती लवकरात लवकर पूर्ण होईल तसेच डोंगरी भागासाठी कायमस्वरूपी वैद्यकीय सेवा मिळावी यासाठी ठोसेघर येथे ग्रामीण रुग्णालयाचे बांधकामही सुरू करण्यात येईल, अशी ग्वाही ना. शिवेंद्रराजे भोसले यांनी दिली.
कारी जिल्हा परिषद गटांतर्गत आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य राजूभैय्या भोसले, ज्ञानेश्वर (भाई) वांगडे, भिकू भोसले, शंकर चव्हाण, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वास सिद, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. युवराज करपे, महावितरणचे कार्यकारी अभियंता डॉ. अमित बारटक्के, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अर्चना वाघमळे, प्रांताधिकारी आशिष बारकूळ, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संतोष रोकडे, अभियंता श्रीपाद जाधव, सातारचे गटविकास अधिकारी सतीश बुद्धे उपस्थित होते.
ना. शिवेंद्रराजे भोसले म्हणाले, कारी गटातील प्रत्येक गावाने मला मताधिक्य दिले आहे. या गावातील मूलभूत सुविधा तसेच सर्व विकास कामे करण्याची माझी जबाबदारी आहे. ती मी पूर्ण करणार आहे.
ठोसेघर येथे ग्रामीण रुग्णालय मंजूर करण्यात आले असून याचे कामही काही दिवसातच सुरू होईल. परळी खोर्यातील युवकांना स्पर्धा परीक्षेला मार्गदर्शन अभ्यासिका, प्रशस्त स्टेडियम उरमोडी धरणाच्या बाजूला उभारण्यात येईल. त्याप्रमाणे जागा हस्तांतरित करण्यासाठी त्यांनी अधिकार्यांना सूचना केल्या. यावेळी ना. शिवेंद्रराजे भोसले यांनी प्रत्येक गावातील पदाधिकार्यांच्या समस्या जाणून त्या तात्काळ सोडवण्याच्या अधिकार्यांना सूचना केल्या.