Mobile privacy : मोबाईल प्रायव्हसीमुळे वैवाहिक जीवनात वादळ

पती-पत्नीमध्ये तू-तू, मै-मै वाढली : विवाह संस्थेचे अस्तित्व धोक्यात
Mobile privacy
Mobile privacyPudhari File Photo
Published on
Updated on

मीना शिंदे

सातारा : मोबाईलचा अतिवापर, सोशल मीडियावरील संशयास्पद वर्तन, साशेल मीडियाचे व्यसन यामुळे पती-पत्नीमध्ये तू-तू, मै-मै होत आहे. त्यातच आता मोबाईलला प्रायव्हसी लॉक व प्रायव्हसी ग्लासमुळे शेजाऱ्यालाही तुम्ही काय पाहता, काय चॅटिंग करता हे कळत नाही. मुक्तांगणच्या समुपदेशन केंद्रात वर्षाभरात 234 तक्रारी दाखल झाल्या असून त्यापैकी तक्रारी या विवाह विषयक आहेत. मोबाईलच्या या प्रायव्हसीमुळे कौटुंबिक कलह व घटस्फोट वाढत असल्याने विवाहसंस्थेच्या अस्तित्वाला धक्का बसला आहे.

आपला मोबाईल, त्यातील महत्वाची माहिती, पासवर्ड, पीन यासह विविध सोशल माध्यमे, स्क्रीन, युट्युब हिस्ट्री आपल्या संमतीशिवाय कोणी मोबाईल उघडून पाहू नये यासाठी प्रायव्हसी लॉकचा उदय झाला. मोबाईल पाहत असताना आपला व्यक्तीगत कामकाज, चॅटींग याबाबत आजूबाजूला बसलेल्यांपासून गोपनीयता रहावी यासाठी प्रायव्हसी ग्लासचा वापर होवू लागला आहे. इतरांनी आपल्या मोबाईलमध्ये डोकावून आपण काय करतो हे पाहणे आवडत नाही, अशावेळी मोबाईल प्रायव्हसी ग्लास वापरली जाते. पण मोबाईलच्या याच प्रायव्हसीमुळे पती-पत्नीमधील नाजूक नात्याला अविश्वासाचे गालबोट लागत आहे. त्याचबरोबर विवाहबाह्य संबंध, ब्लॅक मेलींग सारख्या गोष्टींना सोशल माध्यमातून हवा मिळत असून फसवणुकीसह व्यभिचाराला थारा मिळत आहे. त्यातूनच पती-पत्नीच्या नात्यामध्ये दुरावा येत आहे.

अशाच एका तक्रारीमध्ये पती मोबालमध्ये काय पाहतो ते शेजारी बसूनही मला दिसत नाही. यापूर्वी ते दिसायचे आता का दिसत नाही याबाबत पत्नीच्या मनात संशय आला. कोणाशी चॅटिंग करत आहे, काय करत आहे ते दाखव म्हणून पती व पत्नीची भांडणे जुंपली. वारंवार खटके उडत होते. अखेर ही भांडणे वाढून समुपदेशन केंद्रापर्यंत वाद गेला. अखेर सहसंमतीने नवऱ्याने ती प्रायव्हसी ग्लास बदलून घेतली. दुसऱ्या घटनेमध्ये उच्चशिक्षीत पती-पत्नींमध्ये मोबाईल संपर्कातून तिसऱ्या व्यक्तीचा प्रवेश झाला. मोबाईलला प्रायव्हसी लॉक असल्याने पतीला कोणाचे फोन येतात याची माहिती तिला नव्हती. मित्राच्याच बायकोसोबत विवाह बाह्य संबंध निर्माण झाले. तीचे आधीपासूनच घरी येणे-जाणे असल्याने पत्नीला कळलेच नाही की कधी आपल्या संसाराला सुरुंग लागला. मात्र त्यामुळे पती-पत्नी अन्‌‍ दोन मुले असे हसते खेळते कुटुंब उद्ध्वस्त झाले. त्याने स्वत:च्या पत्नीची माफी मागितली अन्‌‍ पुन्हा नव्याने संसार सुरु केला. मात्र तीला घटस्फोट घ्यावा लागला अन्‌‍ मुलांपासूनही दुरावा आला.

इंटरनेट, स्मार्ट फोनमुळे जग जवळ आले हे खरे असले तरी त्याच्या अतिरेकामुळे समाजमाध्यमांसह कुटुंबामध्येही वादळे उठत आहेत. हसते खेळते कुटुंब उद्ध्वस्त होत आहे. वाढत्या घटस्फोटाच्या प्रमाणामुळे कुटुंब व्यवस्था, लग्नसंस्थेचे अस्तित्व धोक्यात येत आहे. मुक्तांगणमध्ये दि.1 जानेवारी ते 31 डिसेंबर 2025 या एका वर्षात विवाहविषयक 159 तक्रारी दाखल झाल्या आहेत. स्मार्ट फोनवर कार्यरत राहणे, कुटुंबाचा हस्तक्षेप, अनैतिक संबंध आदि कारणांमुळे वाद निर्माण होवून त्याचे पर्यवसन भांडणात झाल्याने या तक्रारी दाखल झाल्या आहेत.

आधुनिक जीवनशैलीबरोबर स्मार्ट फोन हा दैनंदिनीचा अविभाज्य भाग बनला असला तरी त्याचा गैरवापर हा धोक्याचा आहे. मुले फोनमध्ये काय करतात याचा पत्ता आई वडिलांना लागत नाही, हीच बाब पती व पत्नींमध्ये घडत आहे. स्मार्ट फोन अन्‌‍ स्मार्ट फीचर्सचा वापर चांगल्या गोष्टींसाठी करावा, याचे भान सर्वांनाच हवे.
ॲड.वर्षा देशपांडे, सामाजिक कार्यकर्त्या.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news