

सातारा : राज्य शासनाच्या कथित हिंदी सक्तीच्या धोरणाविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) साताऱ्यात आक्रमक पवित्रा घेतला आहे. मनसे शहर शाखेच्या वतीने अध्यक्ष राहुल पवार यांच्या नेतृत्वाखाली सयाजीराव विद्यालयाजवळ सह्यांची मोहीम राबवून सरकारच्या निर्णयाचा तीव्र निषेध करण्यात आला. "हिंदी सक्ती करणाऱ्या सरकारचा निषेध असो" आणि "महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा विजय असो" अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.
या आंदोलनाला शाहूनगर परिसरातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. लहान मुलांपासून ते पालक, लेखक, पत्रकार, साहित्यिक आणि व्यावसायिकांनी सह्या करून या धोरणाला तीव्र विरोध दर्शवला. शासनाने हा निर्णय मागे न घेतल्यास येत्या ५ तारखेला याप्रश्नी मनसेतर्फे भव्य मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती शहर प्रमुख राहुल पवार यांनी दिली.
या आंदोलनात शहराध्यक्ष राहुल पवार यांच्यासह शहर उपाध्यक्ष वैभव वेळापुरे, अझर शेख, भरत रावळ, प्रशांत सोडीमिसे, मनसे जनहित सेनेचे शहराध्यक्ष संदीप दुधळे, जयसिंग पाटणकर, इम्रान शेख, प्रदीप सवाखंडे, आदित्य कुलकर्णी, मनोहर चव्हाण, संतोष सासवडकर, अभिजित इंगळे यांच्यासह अनेक महाराष्ट्र सैनिक सहभागी झाले होते.