

कराड : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कराड शहराच्या वतीने विविध शाळांतील 40 विद्यार्थ्यांना दत्तक घेऊन त्यांना संपूर्ण वर्षाचे शैक्षणिक साहित्य देण्यात आले. तसेच समाजातील दुर्लक्षित घटक बहुरूपी कलाकार यांच्या पाल्यांना सुद्धा दत्तक घेण्यात आले. त्यांना वह्या पेन, पेन्सिल, दप्तर व सर्व शैक्षणिक साहित्य देण्यात आले. या उपक्रमाचे उद्घाटन चित्रकार संदीप डाकवे यांच्या हस्ते करण्यात आले . कराड शहराध्यक्ष सागर बर्गे यांच्या कल्पनेतून हा उपक्रम दरवर्षी राबवला जातो.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने कराड शहरामध्ये गेली 19 वर्षे समाजातील गरजू व सर्वसामान्य स्तरातील विद्यार्थ्यांसाठी ‘ना नफा ना तोटा’या तत्त्वावर स्वस्त वही विक्री केंद्र सुरू असते. याद्वारे अनेक गरजू, गरिब विद्यार्थ्यांना याचा लाभ झाला. शालेय साहित्य नाही म्हणून कोणा गरिब मुलांच्या शिक्षणात खंड पडू नये या तत्वावर हा उपक्रम राबवण्यात येतो. तसेच दरवर्षी शालेय विद्यार्थ्यांना शालेय साहित्य भेट दिले जाते.
यंदाही शहरातील आर्थिकदृष्ट्या गरिब, गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य भेट देण्यात आले. यावेळी जिल्हाध्यक्ष अॅड. विकास पवार, विनायक भोसले, आप्पासाहेब गायकवाड, नितीन महाडिक, चंद्रकांत गायकवाड, निलेश चव्हाण, बंटी वाघ व महाराष्ट्र नवनिर्माण सैनिक उपस्थित होते.