MLC Election | आखाडा सातारा-सांगलीचा; पैलवान खटाव-माणचे

विधानपरिषदेसाठी धैर्यशील कदम विरूध्द अभय जगताप लढत फिक्स
MLC Election
MLC Electionpudhari photo
Published on
Updated on
अविनाश कदम

खटाव : सातारा-सांगली स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या आखाड्यात खटाव आणि माणच्या पैलवानांमध्ये लढत फिक्स झाली आहे. अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी शिंदे सेनेच्या तानाजी पाटील यांनी अर्ज माघारी घेतल्यानंतर महायुती आणि महाविकास आघाडीतील लढत निश्चित झाली आहे.

सातारा-सांगली विधानपरिषद निवडणुकीसाठी महायुतीकडून ही जागा भाजपासाठी सोडण्यात आली तर महाविकास आघाडीकडून येथे शरद पवारांची राष्ट्रवादी लढणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. महायुतीतून अनेक दिग्गज इच्छुक होते. त्यातून खटाव तालुक्यातील भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. त्यांचा उमेदवारी अर्ज भरायला भाजपचे तीन मंत्री, खासदार तसेच आमदार आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते. शिंदे सेनेचे ज्येष्ठ नेते तानाजीराव पवार यांनी अर्ज भरला होता, मात्र महायुती धर्म पाळण्याचा निर्णय झाल्याने मंत्री शंभूराज देसाई यांच्या उपस्थितीत त्यांनी अर्ज माघारी घेतला.

विरोधी महाविकास आघाडीतून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे युवक सरचिटणीस माण तालुक्यातील अभयसिंह जगताप यांनी अर्ज भरला होता. भाजपकडून निवडणूक बिनविरोध करण्याचे म्हणावे तसे प्रयत्न न झाल्याने आता महायुती विरुध्द महाविकास आघाडी अशी मुख्य लढत होणार आहे.

सातारा-सांगली मतदारसंघात मतदान आकडेवारीचा विचार केला असता सातारा जिल्ह्यात सांगलीपेक्षा अधिक मते आहेत. त्यातच मैदान दोन्ही जिल्ह्याचे असले तरी मुख्य लढत खटाव आणि माणमधील पैलवानांमध्ये होणार आहे. यापूर्वी खटावच्याच प्रभाकर घार्गेंनी या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले होते. त्यांची विधान परिषदेवर बिनविरोध निवड झाली होती. त्यानंतर सांगलीच्या मोहनराव कदम यांनी निवडणूक लढवून विजय मिळवला होता. त्यांच्या विरोधात माणमधील शेखर गोरे यांनी लढत दिली होती. आता पुन्हा खटाव आणि माणभोवती ही निवडणूक केंद्रीत झाली आहे. दोन्ही उमेदवार सातारा जिल्ह्यातील लगतच्या तालुक्यातील आणि ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांचे वर्चस्व असलेल्या टापूतील असल्याने या भागाचा राजकारणावरील पगडा अधोरेखित झाला आहे.

कागदावर भाजप, शिंदेसेना आणि अजित पावार राष्ट्रवादी यांच्या महायुतीचे पारडे जड आहे तर शरद पवार राष्ट्रवादी, काँग्रेस आणि उध्दव सेनेच्या महाविकास आघाडीची मते तुलनेने कमी असल्याचे दिसत आहे. त्यातच अभयसिंह जगताप यांचा अर्ज भरताना शरद पवार राष्ट्रवादीसह महाविकास आघाडीने महत्वाच्या नेते पदाधिकाऱ्यांसह शक्तीप्रदर्शन केल्याचे दिसले नव्हते. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधान परिषद निवडणुकीत हेवेदावे, मागील उट्टे काढणे, जिरवाजीरवी, बदला घेणे, डावलण्यात आल्यामुळे नाराजी दाखवणे, पक्षांतर्गत वाद आणि क्रॉस व्होटींग हे फॅक्टर्स चांगली उचल खातात. कागदावर पारडे जड असलेली महायुती हे फॅक्टर्स कसे टॅकल करते यावर माण-खटावमधील पैलवानांची लढत चुरशीची होणार कि एकतर्फी होणार हे पाहायला मिळणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news