

वडूज : महायुती सरकारच्या चुकीच्या कारभारामुळे आणि घेत असलेल्या निर्णयामुळे संपूर्ण राज्यात कायदा व सुव्यवस्था पूर्णपणे खालावली असून ती धोक्यात आहे. सर्व सामान्य जनतेमध्ये सरकार विरोधात मोठा राग आहे. ग्रामीण भागातील रस्त्यांची मोठी दुर्दशा झाली असून सर्वत्र खड्डेच खड्डे पडले आहेत. अनेक योजनांमध्ये प्रचंड भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष आ. शशिकांत शिंदे यांनी केला.
खातगुण, ता. खटाव येथे नव्याने बांधलेल्या शिवकल्याण ग्रामसंसद व आरोग्यदिप आरोग्य उपकेंद्राच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी सिक्किमचे माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील, माजी आमदार प्रभाकर घार्गे, जिल्हा बँकेचे संचालक प्रदीप विधाते, बाजार समितीचे माजी संचालक राजेंद्र कचरे, जोतीनाना सावंत, गौरव जाधव, निवृत्त कक्ष अधिकारी प्रविण लावंड, डॉ. सविता वाघ, सरपंच अमिना सय्यद, चेअरमन नानासो लावंड, मनोज देशमुख उपस्थित होते. खा. श्रीनिवास पाटील म्हणाले, येणाऱ्या सर्व निवडणुकीत सर्वांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पार्टीच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहावे.
प्रभाकर घार्गे म्हणाले, राज्यातील एकमेव उदाहरण असेल की या गावात राम आणि रहिम एकत्र नांदत आहेत. राजकारणात सत्ता येत असते जात असते. परंतु गावाचा विकास, समाजाचा विकास ही भावना मनामध्ये ठेवून काम करायचे असते. खातगुण गावाने एवढ्या वादळात सुद्धा आपला दिवा चांगला तेवत ठेवला त्याबद्दल तुम्हा सर्वांचे कौतुक केले पाहिजे.
प्रास्तविकामध्ये राम रहिम संघटनेचे प्रमुख वसंतराव जाधव म्हणाले, 4 वर्षापूर्वी सरकार आमचं सत्ता आमची त्यावेळी या इमारतीला नवीन बांधकामासाठी निधी मंजूर झाला. त्यावेळी आताच्या मान्यवरांच्या उपस्थित भूमिपूजनही करण्यात आले होते. खातगुण गावासाठी इमारत मंजूर झाली पण ज्यांना मिळाले आहे त्यांना तसेच असू द्यावे पण दुसऱ्याची इमारत स्वतःच्या गावाला पळवून नेणे हे नैतिकतेत बसत नसल्याचा टोला त्यांनी विरोधकांना लगावला. सूत्रसंचलन अर्जून जाधव, दादा मुळे यांनी केले. आभार उपसरपंच आनंदराव लावंड यांनी मानले. यावेळी शिवाजी लावंड, यशवंत लावंड, विजय लावंड, संजय पवार, सिताराम लवंड, ग्रामसेवक विनोद बनकर, मंदाकिनी लावंड, मनिषा माने, काजल जाधव, अलका पवार, उज्वला माने उपस्थित होते.