

सातारा : भाजपच्या माध्यमातून देशातील लोकशाही संपवण्याचे कारस्थान सुरु आहे. सत्तेचा वापर हुकूमशाही करता केला जातोय पण कोणी ताम्रपट घेऊन आलेला नाही. भाजपच्या हुकूमशाही विरोधातील लढाईची चिंगारी ऐतिहासिक साताऱ्यातून पेटवा. नगरपालिका निवडणुकीत सातारकरांनी सौ. सुवर्णा पाटील यांना नगराध्यक्षपदाची संधी द्यावी, महाविकास आघाडीला साथ द्यावी, या संधीचा सोनं करुन दाखवू नाहीतर राजकारण सोडू, असे जाहीर वक्तव्य राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आ. शशिकांत शिंदे यांनी केले.
सातारा नगरपालिका निवडणुकीतील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सौ. सुवर्णा पाटील यांच्यासह महाविकास आघाडी उमेदवारांच्या प्रचारार्थ येथील ऐतिहासिक गांधी मैदानावर आयोजित केलेल्या जाहीर सभेत आ. शिंदे बोलत होते. यावेळी रासपचे अध्यक्ष व माजी मंत्री महादेव जानकर, माजी आमदार लक्ष्मण माने, नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सौ. सुवर्णा पाटील, पार्थ पोळके, ॲड. वर्षा देशपांडे, काँग्रेसच्या रजनीताई पवार, नरेंद्र पाटील, राजेंद्र शेलार, नरेश देसाई, राजकुमार पाटील, गोरखनाथ नलावडे, अर्चना देशमुख, तेजस शिंदे, मनसेचे शहराध्यक्ष राहुल पवार, सुषमाराजे घोरपडे, ॲड. दत्ता धनावडे, अस्लम तडसरकर उपस्थित होते.
आ. शशिकांत शिंदे म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक खा. शरद पवार यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना 50 टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला. त्यांच्याच शिकवणीप्रमाणे साताऱ्याचे प्रथम नागरिक बनण्यासाठी आम्ही सौ. सुवर्णा पाटील यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी दिली आहे. सातारा बदलण्याचे व्हिजन घेऊन आम्ही चाललो आहोत. सौ. सुवर्णा पाटील यांना साथ देवून साताऱ्यात इतिहास घडवून दाखवा. साताऱ्यात घडलेला बदल हा देशात बदल घडवल्याशिवाय राहणार नाही.
सौ. सुवर्णा पाटील म्हणाल्या, साताऱ्याच्या खडकाळ माळावर कमळ फुलवण्याचे काम आम्ही केले. पण आमच्याच विरोधात मोठे कांड झाले. नगराध्यक्ष काय पण वॉर्डातील नगरसेवक पदाचे तिकीट देखील कापले गेले. 2009 पासून मी पक्षांमध्ये संघटनात्मक काम केले. माझ्या पाठीशी समाज आहे. आ. शशिकांत शिंदे यांच्यासारखे नेतृत्व आहे. 35 वर्षापूर्वी मी साताऱ्यात आहे.
मात्र साताऱ्यात काहीच बदलले नाही. शिक्षण व्यवस्था, नोकरी नाही म्हणून साताऱ्यातील मुले पुणे मुंबईत जातात. हे मला थांबवायचे आहे. साताऱ्यात रोजगार निर्मिती करायची आहे. मी पैलवानाची लेक आणि वकिलाची सून आहे. समाजकारणाचे बीज माझ्या रक्तात आहे. सातारा बदलण्याच्या क्रांतीत साथ द्या. यावेळी महादेव जानकर यांचेही भाषण झाले.