

सातारा : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नूतन प्रदेशाध्यक्ष आ. शशिकांत शिंदे यांचे मायभूमी सातारा जिल्ह्यात शनिवारी धमाकेदार स्वागत करण्यात आले. शिरवळपासून कराडपर्यंत आ. शशिकांत शिंदे यांचा जलवा पाहायला मिळाला. फटाक्यांची आतषबाजी, गुलालाची उधळण करत कार्यकर्त्यांनी तोबा गर्दी केली. यावेळी सातार्यासह ठिकठिकाणी जेसीबीमधून त्यांच्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली. महाकाय क्रेनच्या सहाय्याने आ. शशिकांत शिंदे यांना पुष्पहार घालण्यात आला. दरम्यान, तमाम कार्यकर्त्यांच्या मांदियाळीत आ. शशिकांत शिंदे हरवून गेल्याचे पहायला मिळाले.
प्रदेशाध्यक्ष आ. शशिकांत शिंदे यांचे सातारा जिल्ह्यात आगमन होणार असल्याने त्यांच्या स्वागतासाठी शिरवळपासून कराडपर्यंत महामार्गा-वरील प्रमुख गावांच्या ठिकाणी कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. शिरवळ येथे स्वागत झाल्यानंतर खंडाळा, कवठे, भुईंज, पाचवड, आनेवाडी टोलनाका येथे कार्यकर्त्यांकडून होणारे स्वागत स्वीकारत आ. शिंदे यांच्या वाहनांचा जथ्था वाढे फाटामार्गे सातार्यात पोहोचला.
सातार्यातील राष्ट्रवादी भवन परिसरात आ. शिंदे यांच्या स्वागतासाठी संपूर्ण सातारा जिल्ह्यातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहिले होते. राष्ट्रवादी भवनासमोर स्वागत कमान उभारण्यात आली होती. तर जागोजागी त्यांच्या स्वागताचे फलक लावण्यात आले होते. रस्त्याच्या मध्यभागी पक्षाचे झेंडेही लावले होते. महिला पदाधिकार्यांनी फेटे बांधले होते. या महिलांनी आनंदाने कार्यालयासमोर फुगड्या घातल्या. आ. शशिकांत शिंदे येताच फटाक्यांची जोरदार आतिषबाजी करण्यात आली. कार्यकर्त्यांनी त्यांचे पुष्पहार, बुके देऊन उत्साहात स्वागत केले. ‘शिंदेसाहेब तुम आगे बढो... हम तुम्हारे साथ है, पवारसाहेबांचा निष्ठावान मावळा शिंदेसाहेब... शिंदेसाहेब’, अशा जोरदार घोषणा महिला व कार्यकर्त्यांनी दिल्या. यावेळी महिला पदाधिकार्यांनी आ. शशिकांत शिंदे यांचे औक्षण केले.
राष्ट्रवादी भवनापासून रॅलीला पुन्हा सुरुवात झाली. ही रॅली पोवईनाक्यावर येऊन थांबली. कार्यकर्त्यांनी आ. शिंदे यांना खांद्यावर उचलून घेतले. या ठिकाणी दोन जेसीबीवर अडकवलेले भले मोठे हार आ. शिंदे यांना घालण्यात आले. येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन त्यांनी अभिवादन केले. यावेळी ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय..’ अशा जोरदार घोषणा देण्यात आल्या. शिवतीर्थाच्या सभोवती हजारोंच्या संख्येने उपस्थित असलेली जनता हा सोहळा न्याहाळत होती. त्यानंतर स्वर्गीय यशवंतराव चव्हाण आणि किसनवीर यांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.
यानंतर ही रॅली बॉम्बे रेस्टॉरंट चौकामध्ये गेली. येथेही जेसीबीतून पुष्पहार घालण्यात आला. यानंतर रॅली अजंठा चौकाकडे गेली. तिथे तर सकाळपासूनच कार्यकर्त्यांचा उत्साह होता. ठिकठिकाणी स्वागत स्वीकारत पुढे जात असल्याने आ. शिंदे यांच्या रॅलीच्या नियोजनाची वेळ पुढे-पुढे जात होती. अजंठा चौकात दुपारी चार वाजता रॅली पोहोचली. येथे कार्यकर्त्यांनी फटाक्यांची जोरदार आतषबाजी केली. रॅलीमध्ये प्रभाकर देशमुख, जिल्हाध्यक्ष सुनिल माने, सरचिटणीस राजकुमार पाटील, युवकचे प्रदेश उपाध्यक्ष गोरखनाथ नलवडे, बंडू ढमाळ, अर्चना देशमुख, संगिता साळुंखे, डॉ. नितीन सावंत, सुभाष कारंडे, दिलीप बाबर, तेजस शिंदे, साहिल शिंदे या पदाधिकार्यांसह शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते.
आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या रॅलीने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे वातावरण निर्माण केले. प्रदेशाध्यक्षपदावर आ. शशिकांत शिंदे यांची वर्णी लागल्यानंतर कार्यकर्त्यांमध्ये हत्तीचे बळ आल्याचे पहायला मिळाले. ‘आवाज कोणाचा... आवाज जनतेचा.. दाही दिशांतून घुमला राष्ट्रवादी पुन्हा’ या गाण्याने तर कार्यकर्त्यांचा उत्साह द्विगुणित झाल्याचे पाहायला मिळाले.
केंद्रात व राज्यात सत्ता नसतानाही हजारोंच्या संख्येने स्वागतासाठी जमलेल्या कार्यकर्त्यांना पाहून आ. शशिकांत शिंदे भावूक झाल्याचे पाहायला मिळाले. गर्दीतून जाताना धक्काबुक्की होत होती. कार्यकर्ते खांद्यावर घेऊन नेत होते, तरीही कार्यकर्त्यांचा कुठलाच आग्रह आ. शिंदे यांनी मोडला नाही.