

सातारा : निवडणूक प्रक्रियेवर सामान्य जनतेचाही आता विश्वास राहिलेला नाही. निवडणुकीत घोळ करण्यासाठीच मतमोजणी लांबणीवर टाकण्यात आली आहे. अशी चर्चा सामान्य जनतेमध्ये जाहीरपणे सुरू आहे, अशी टीका राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आ. शशिकांत शिंदे यांनी केली आहे.
राष्ट्रवादी भवन येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना आ. शिंदे म्हणाले, निवडणूक आयोगाने अत्यंत घाईगडबडीने निवडणुकीचा प्रोग्राम लावला. एखादी त्रुटी राहिली तरी लोक न्यायालयात जाणार, याचे सुतोवाच मी यापूर्वीच केले होते, तसेच झाले आहे. राज्याचे मुख्यमंत्री तसेच सरकारमधील लोकांना हे माहीत नव्हते का? राज्यात सरकारची तीन माकडासारखी परिस्थिती आहे. निवडणूक आयोगाने न्यायालयाकडे मुदत वाढवून घेण्याची मागणी केली नाही. तसेच घाईगडबडीत प्रोग्रॅम जाहीर करून विरोधकांना निवडणुकीत कशा पद्धतीने रोखता येईल, हेच पाहिले गेले आहे.
आता न्यायालयाच्या आदेशानुसार निवडणूक लांबणीवर गेली आहे. सत्तेत असलेले लोक काहीही करु शकतात, अशीच महाराष्ट्रातील सामान्य जनतेची भावना आहे. ईव्हीएम मशीनमध्ये घोटाळा करण्यासाठीच निवडणूक पुढे ढकलली गेली आहे, अशी जाहीर चर्चा सर्वसामान्यांमध्ये सुरू आहे, असे देखील आ. शशिकांत शिंदे म्हणाले.