

सातारा : राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदाची धुरा अखेर आ. शशिकांत शिंदे यांच्या खांद्यावर सोपवण्यात आली आहे. मुंबईत पक्षाच्या झालेल्या बैठकीत थोरल्या पवारांनी भाकरी फिरवत आपला हुकमी एक्का बाहेर काढला. आ. जयंत पाटील यांनी कोअर कमिटीच्या बैठकीत राजीनामा दिल्यानंतर ही खांदेपालट करण्यात आली.
मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या सभागृहात मंगळवारी झालेल्या बैठकीमध्ये आ. जयंत पाटील यांनी सात वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर अखेर आपला राजीनामा सादर केला. आ. जयंत पाटील हे प्रदेशाध्यक्षपद सोडणार असल्याचे संकेत दै. ‘पुढारी’ने महिनाभरापूर्वीच दिले होते. तेव्हाच दै. ‘पुढारी’ने आ. शशिकांत शिंदे हे प्रदेशाध्यक्षपदाच्या रेसमध्ये असल्याचे वृत्त प्रसिद्ध केले होते. हा अंदाज मंगळवारी अखेर खरा ठरला.
बैठकीला पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्यासह विद्यमान प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी मंत्री अनिल देशमुख, जितेंद्र आव्हाड, हर्षवर्धन पाटील, शशिकांत शिंदे यांच्यासह महत्त्वाचे नेते उपस्थित होते. या बैठकीत अनिल देशमुख यांनी नवीन प्रदेशाध्यक्षपदासाठी शशिकांत शिंदे यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवला. त्यानंतर सुनील भुसारा व उत्तम जानकर यांच्याकडूनही या प्रस्तावाला अनुमोदन देण्यात आले. त्यानंतर शरद पवार यांनी या प्रस्तावावर आपले मत व्यक्त केले. अनिल देशमुख यांनी जे नाव सुचवले आहे, त्या नावाला खासदार अमोल कोल्हे यांनी अनुमोदन दिले आहे. हे नाव आपल्या सगळ्यांच्या समोर आहे. या निवडणूक प्रक्रियेत शशिकांत शिंदे यांचे एकच नाव आले असल्याचे सांगत शरद पवार यांनी शशिकांत शिंदे यांच्या नावाची पक्षाचे नवे प्रदेशाध्यक्ष म्हणून घोषणा केली.
आ. शिंदे यांची प्रदेशाध्यक्षपदी निवड होताच ‘राष्ट्रवादी काँग्रेसचा विजय असो,’ ’आ. शशिकांत शिंदे आगे बढो...हम तुम्हारे साथ है,’ अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. शिंदेंची मुलुखमैदान तोफ आता राज्यभर गरजणार आहे. निवडीनंतर बोलताना खा. शरद पवार म्हणाले, पक्षाच्या प्रमुख पदाधिकार्यांनी प्रदेशाध्यक्षपदासाठी आ. शशिकांत शिंदे यांचे नाव एकमताने सुचवले आहे. त्यामुळे मी त्यांचे प्रदेशाध्यक्षपदासाठी नाव घोषित करतो. ते यशस्वीपणे पक्षाची धुरा सांभाळून पक्षाला यश मिळवून देतील. याबाबत माझ्या मनात कोणतीही शंका नाही.
निवडीनंतर बोलताना आ. जयंत पाटील यांनी आपण कुठेही जाणार नसल्याचे स्पष्ट केले. ते म्हणाले, सेनापती बदलला तरी सेना अजून सज्ज आहे. शाहू, फुले, आंबेडकर यांचा विचार घेऊनच पक्षाची पुढील वाटचाल अधिक ताकदीने सुरु राहिल. मी प्रदेशाध्यक्षपद सोडले असले तरी मी कुठेही जाणार नाही.
अलीकडच्या विधानसभा निवडणूक निकालांवर ते म्हणाले, विधानसभा निवडणूक खूप ताकदीने लढवली पण त्यात आपल्याला पाहिजे तसे यश प्राप्त नाही झाले, असे का झाले तर या मॅचचा अंपायर आधीच फिक्स झाला होता. स्टंपला बॉल लागून विकेट गेली तरी अंपायरने नो बोल दिला.