

सातारा : सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत शेतकरी सभासदांनी दिलेला कौल मान्य केला आहे. मात्र, सत्ताधारी कारखाना जिंकला म्हणून संपूर्ण महाराष्ट्र जिंकल्याच्या अविर्भावात वावरत आहेत. सहकारातील निवडणुकीला इतर निवडणुकांसाठी राजकीय संदर्भ नसतात. त्यांनी 9 हजार मयत शेतकरी सभासदांच्या नोंदी रखडवल्यामुळे त्यांचा विजय सुकर झाला. म्हणून बाकीच्या निवडणुका बॅलेटवर घ्या, ईव्हीएममुळे विधानसभेला निवडून आले म्हणणे चुकीचे आहे. मी आमदारकीचा राजीनामा देऊन विधानसभा निवडणूक लढवायला तयार आहे, अशा शब्दांत आ. मनोज घोरपडे यांनी नाव न घेता माजी मंत्री बाळासाहेब पाटील यांना पत्रकार परिषदेत चॅलेंज दिले.
कराड येथील सह्याद्री सहकारी कारखान्याची निवडणूक झाल्यानंतर पॅनेलप्रमुख आ. मनोज घोरपडे यांनी भूमिका मांडली. ते म्हणाले, सह्याद्री सहकारी साखर कारखान्याची अनेक दशकांपासून एकाच कुटुंबाची सत्ता राहिली आहे. सत्तेचे विकेंद्रीकरण करून कारखाना सभासदांच्या ताब्यात द्यावा हा यशवंत विचार घेऊन या निवडणुकीला सामोरे गेलो. पॅनेल टाकून ही निवडणूक लढवावी असा आग्रह सभासदांचा होता. ही निवडणूक जिंकून मला कारखान्याचा चेअरमन व्हायचे नव्हते. सभासदांना न्याय मिळून देण्यासाठी सह्याद्री कारखान्याची निवडणूक लढली. या निवडणुकीत अपयश आले असले तरी सत्ताधार्यांना या निवडणुकीतून प्रचंड विरोध झाल्याचे दिसते.
सत्ताधार्यांनी 9 हजार मयत सभासदांच्या वारसांना सभासद करून घेतले नाही. त्यांच्याशी एकनिष्ठ असलेल्या सभासदांच्याच नोंदी करून त्यांनी ही निवडणूक लढवली. तरीही त्यांना 10 हजार शेतकरी सभासदांनी नाकारले, हे विसरून चालणार नाही. कारखाना जिंकला म्हणून मविआच्या नेत्यांनी महाराष्ट्र जिंकला असे नव्हे. सहकारातील निवडणुका व इतर निवडणुका या वेगळ्या असतात. त्याचे संदर्भ वेगळे असतात. कारखान्याच्या निवडणुकीत विधानसभेचे मतदार नव्हते. बहुतांश सभासद हे सत्ताधार्यांच्या विचारांचे होते. कराड उत्तर मतदारसंघातील खूप कमी भागातील सभासद कारखान्याच्या निवडणुकीत होते. या निवडणुकीच्या विजयामुळे विरोधकांनी हुरळून जाऊ नये. विधानसभा निवडणुकीत मी हिंमतीवर निवडून आलो. ते नेहमीप्रमाणे ईव्हीएम मशीनचे कारण पुढे करून बॅलेट पेपरवर निवडणूक घ्या, अशी चर्चा करत आहेत. मी आमदारकीचा राजीनामा देवून पुन्हा निवडणूक लढायला तयार आहे.
विरोधकांचे दोन पॅनेल पडल्याचा बाळासाहेबांना फायदा झाला का? असे विचारले असता आ. मनोज घोरपडे म्हणाले, स्थानिक निवडणुकांमध्ये आघाड्या होत असतात. सहकारातील राजकारण हे इतर निवडणुकांपेक्षा वेगळे असते. आमच्या पॅनेलला 7500 ते 8 हजार मते तर त्यांना 2100 मते मिळाली. एकत्र निवडणूक लढवावी यासाठी बैठकाही झाल्या. मात्र, काहीजणांना आम्हाला एकत्र येऊ द्यायचे नव्हते. प्रत्येकाची राजकीय गणिते वेगळी असतात. या निवडणुकीत काहीही झाले असले तरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीचे सर्व नेते एकत्र असतील. मेळाव्यात सभासदांनी सत्ताधार्यांविरोधात कौल दिला होता. त्यामुळी ही निवडणूक लढणे गरजेचे होते. राज्यातील जनतेने मविआला नाकारले आहे. त्यामुळे आमदारकीचा राजीनामा देऊन पुन्हा जनमाणसांचा कौल घेऊ शकता. ईव्हीएम मशीन हा त्यांचा इश्यू आहे. त्यांनी ईव्हीएम मशीन हॅक करून दाखवावे. विधानसभेला झालेला पराभव अजून त्यांना मान्य नाही. जनमाणसात संपलेली पत ते मान्य करत नाहीत हे आमच्यादृष्टीने चांगले आहे.
रोहिणी खडसे यांनी पराभवासंदर्भात केलेल्या ट्विटबद्दल विचारले असता, आ. मनोज घोरपडे म्हणाले, त्यांना सहकार निवडणुकांबद्दल कळत असेल तर त्यांनी ट्विट करणे चुकीचे आहे. सहकार कळत नसेल म्हणून त्यांनी ट्विट केले असेल, असा टोला आ. घोरपडे यांनी लगावला. अॅड. उदयसिंह उंडाळकर यांच्या मदतीबाबत छेडले असता आ. घोरपडे म्हणाले, कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघ हा माझा नसतानाही तेथील सभासदांनी आमच्या पॅनेलला मतदान केले. उदयसिंह व त्यांच्या कार्यकर्त्यांनी आमचेच प्रामाणिकपणे काम केले असल्याचे सांगितले.
सह्याद्री कारखान्याबाबत आगामी भूमिका काय? असे विचारले असता आ. मनोज घोरपडे म्हणाले, सत्ताधार्यांनी नोंदीपासून वंचित ठेवलेल्या मयत सभासदांच्या वारसांच्या सभासद नोंदी घालून त्यांना न्याय दिला जाईल. सभासदांना मोफत साखर मिळाली पाहिजे. कारखान्याचे गेल्या तीन वर्षांपासून एक्सपान्शनचे रखडलेले काम मार्गी लागले पाहिजे. सभासदांच्या पैशाची नासाडी सुरू असल्याने या कामाची चौकशी झाली पाहिजे, यासाठी लढणार असल्याचे सांगितले.
आगामी निवडणुकीत धैर्यशील कदमांसोबत जुळवून घेणार का? असे विचारले असता आ. मनोज घोरपडे म्हणाले, राजकारणात कायम शत्रू कोणच नसतो. कारखान्याच्या निवडणुकीत एकत्र आलो असतो तर आणखी फायदा झाला असता. त्यांना 9 जागा द्यायला तयार होतो. मात्र, त्यांनी ताकद आजमावली. या निवडणुकीचे सिंहावलोकन करणार असून तळागाळात जाऊन माहिती घेणार आहे.