

फलटण : आम्ही शून्यातून राजकारणाची सुरुवात केली होती. कार्यकर्त्यांनीही साथ दिली. गत 2-3 महिन्यांत काही अडचणीमुळे मला वेळ देता आला नाही. आता मी गावोगावी बैठका घेऊन लोकांनाच विचारणार ‘आमचं काय चुकलं ते सांगा? जे चुकलं ते दुरुस्त करून घेऊ’. जनतेला सांगणार आहे आमचं जे चुकलं असेल त्याहीपेक्षा तुमच्यापुढे जे नेतृत्व तयार होत आहे ते नेतृत्व तुम्हाला तुमच्या पिढीला लाभकारक ठरणार नाही. झालं ते झालं. मी हार मानणारा माणूस नाही, बिघडलेली राजकीय परिस्थिती बदलण्याबरोबर तालुक्याची बसवलेली घडी कोणालाही विस्कटू देणार नाही, असा इशारा विधान परिषदेचे माजी सभापती आ. रामराजे ना. निंबाळकर यांनी दिला.
कुरवली, ता. फलटण येथे बाणगंगा धरण पाणी पूजन प्रसंगी ते बोलत होते. आ. रामराजे म्हणाले, विधानसभेला 10-20 हजारांनी आपला उमेदवार पडला असला तरी राजकारणातील आपला मूलभूत पाया आजही मजबूत आहे. तरुणांना भूतकाळातील दुष्काळी परिस्थितीची, विपरीत परिस्थितीत केलेल्या संघर्षाची जाणीव करुन देण्याची गरज आहे. आमच्याकडून तसेच आमच्या कार्यकर्त्याकडून काही चुका झाल्या असतील.
झालेल्या चुका दुरुस्त करून आपणाला पुढे जायचं आहे. तरुण पिढीचा मी पाठीराखा आहे. त्यांना सोबत घेऊन आपणाला पुढे जायचे आहे. सामाजिक कार्यकर्त्यांना थोडा वेळ द्यावाच लागतो. कोणीतरी म्हणतं रामराजेंनी पाण्यासाठी काय केल? मला त्यांना प्रश्न विचारायचा आहे की मी पाण्यासाठी काय केलं नाही ते सांगा? एमआयडीसीसाठी काय केलं? कमिन्समध्ये 6 हजार लोक काम करतात हेच त्याचे उत्तर. उलट खूपजन कमिन्सला टाळे ठोकायला निघालेत. मी पैसे खाल्ल्याचा आरोप करत आहेत. काहीही बोलतात.
मी हार मानणारा हा माणूस नाही, आता संघर्ष करणार शून्यातूनच राजकारण निर्माण केलं होतं. काही कारणामुळे लोकांमध्ये मला जाता आलं नव्हतं. आता मात्र प्रत्येक गावात राजकारण विरहित बैठका घेऊन विकासाची भूमिका समजावून सांगणार आहे. आमच्यातून गेलेले 3-3 तास झाडू मारत असतात. मतं मिळवण्यासाठी नव्हे तर जनतेसाठी आम्ही कामं केली. मी हे केलं, ते केलं, असं जे विरोधक म्हणतात ना त्याचा 90 टक्के पाया मी घातला आहे.
मोठ्या कष्टाने बसवलेली तालुक्याची घडी विस्कटू देणार नाही. यांच्या हातात सगळं गेलं तर सत्यानाश व्हायला वेळ लागणार नाही. मतं विकली गेलीत. पैसे घेऊन मत देणार असाल तर 30 वर्षे संघर्ष करून मी पाणी आणलं. माझ्या आयुष्यातील ती 30 वर्षे मला परत देऊन टाका. पाया मी घातलाय, कळस लावायला हे पुढे आहेत. यांच्या हातून काहीही विकास होणार नाही. ते फलटणसाठी काहीच करणार नाहीत, काही केलंच तर फलटण सोडून बाहेर करतील. कारण त्यांना दिल्लीला जायचंय, असा उपरोधिक टोलाही आ. रामराजे यांनी रणजितसिंह निंबाळकर यांचे नाव न घेता लगावला.