

खटाव : खटावचे आमदार धनुष्य बाणावर निवडून आले आणि पत्नीला कमळ चिन्हावर निवडणुकीत उभे केले आहे. असे कुठेही पहायला मिळत नाही, असा टोला खा. नितीनकाका पाटील यांनी आ. महेश शिंदेंना लगावला. दरम्यान, चव्हाणसाहेबांच्या पुरोगामी विचारांच्या राष्ट्रवादीची शकले झाल्यानेच काही चुकीच्या प्रवृत्ती राजकारणात आल्या असा घणाघातही त्यांनी केला.
पुसेगाव येथे दोन्ही राष्ट्रवादी, काँग्रेस आणि मित्रपक्षांच्यावतीने आयोजीत खटाव आणि बुध जिल्हा परिषद गटांच्या मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी प्रदेशाध्यक्ष आ. शशिकांत शिंदे, माजी आमदार प्रभाकर घार्गे, तालुकाध्यक्ष प्रदीप विधाते, ज्योतीनाना सावंत, वसंतराव जाधव, तेजपाल वाघ, राहुल पाटील, प्रिती घार्गे, गौरव जाधव, सागर साळुंखे, अविनाश कर्णे, डॉ. महेश पवार, मानाजी घाडगे, अशोकराव कुदळे, गणेश जाधव, दोन्ही राष्ट्रवादी व काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.
खा. पाटील पुढे म्हणाले, आ. महेश शिंदेंचे राजकारण उभे करणारे राहुल पाटील भविष्यात प्रतिस्पर्धी होतील म्हणूनच त्यांना डावलण्यात आले. या भागात पुरोगामी विचार धनशक्तीच्या जोरावर बाजूला केला जातोय. पैशाने कार्यकर्ते लाचार केले जात आहेत. अशा चुकीच्या प्रवृत्ती थांबवायला साथ द्या, असे आवाहनही त्यांनी केले.
आ. शशिकांत शिंदे म्हणाले, जिहे-कठापूरच्या अनेक कामांना मी जलसंपदा मंत्री असताना निधी दिला. या योजनेत अनेकांचे मोठे योगदान आहे. या भागात आम्ही अनेक साखळी सिमेंट बंधारे उभारुन दुष्काळावर मात करण्याचे प्रयत्न केले, मात्र कावळा बसायची आणि फांदी तुटायची वेळ आल्याने नको त्यांनी श्रेय घेतले. पहाटेचा शपथविधी माहित होता. पण पहाटेचे पाणीपूजन आम्ही पहिल्यांदाच पाहिले. आण्णा, दादांचे वारस असणारे राहुल पाटील बरोबर होते म्हणून खटावची ग्रामपंचायत निवडून आली होती. त्या निकालावरच महेश शिंदेंची वाटचाल पुढे गेली होती. मात्र आता राहुल पाटलांना डावलण्यात आले. या भागात दादागिरी आणि दडपशाही सुरु आहे. सहकारी नेतृत्व मोठे होवू नये म्हणून लोकशाहीचा खून केला जातोय. दादागिरी आम्हालाही करता येते, मात्र आम्ही प्रेमाने जनतेला आपलेसे करत आलो आहोत. आता असले उद्योग चालणार नाहीत. खटाव, बुधमधून परिवर्तनाची लाट आणून येथील सूज्ञ जनता इतिहास घडवणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
प्रभाकर घार्गे यांनी जिहे-कठापूर योजनेच्या कामात अनेकांचे योगदान असल्याचे सांगून हक्काच्या पाण्यासाठी कुणी जनतेला वेठीस धरणार असेल तर चालणार नाही. वर्षानुवर्षे भरणारी सेवागिरी महाराजांची यात्रा कुणाच्या कुणाच्या सांगण्यावरुन भरत नाही. चुकीची प्रवृत्ती हाकलून द्यायची सुरुवात खटावमधूनच होणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
खटाव गटाचे राष्ट्रवादीचे उमेदवार राहुल पाटील म्हणाले, आमदारांच्या राजकीय वाटचालीत अनेक वर्षे काळ, वेळ न पहाता त्यांना प्रामाणिकपणे मनापासून साथ दिली. त्यांनीही कायम जिल्हा परिषद निवडणुकीत मला संधी देण्याचा शब्द सर्वांसमोर आणि अनेक वेळा दिला होता. मात्र वेळ आल्यावर माझ्यावर खोटे आरोप करुन मला बाजूला सारण्यात आले. त्यांचा हा निर्णय स्वाभिमानी कार्यकर्ते आणि जनतेलाही पटला नाही. आता आमच्या कार्यकर्त्यांना धमकावले जात आहे. खोटे बोलून फूस लावली जात आहे, मात्र आमदारांची सगळी अंडी, पिल्ली मला माहित आहेत. विनाकारण मला तोंड उघडायला लावू नका, असा इशाराही त्यांनी दिला.