

सातारा : कृषी क्षेत्रामध्ये वापरल्या जाणार्या औषधांची बनावट पद्धतीने निर्मिती करणार्या कंपन्यांवर गुन्हे दाखल करण्यासाठी राज्य शासनाने पुढाकार घ्यावा, अशी लक्षवेधी मागणी आ. मनोजदादा घोरपडे यांनी विधिमंडळ अधिवेशनात केली.
विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सध्या सुरू आहे. या अधिवेशनामध्ये आ. मनोज घोरपडे यांनी शेतकर्यांच्या प्रश्नावर आवाज उठवला. सभागूृहाचे लक्ष वेधताना ते म्हणाले, अनेक वर्षांपासून कृषी क्षेत्रासाठी लागणार्या औषधांची काही कंपन्यांकडून बनावट पद्धतीने निर्मिती केली जाते. ही औषधे राज्यातील कृषी सेवा केंद्रांवर विक्रीसाठी उपलब्ध होतात. कृषी विभागाच्या वतीने ज्यावेळी कृषी सेवा केंद्रांच्या तपासण्या केल्या जातात, तेव्हा ही औषधे बनावट असल्याचे समोर येते. त्यानंतर कृषी सेवा केंद्र धारकांवर गुन्हे दाखल केले जातात.
खरे पाहिले तर कृषी सेवा केंद्र धारक हे कंपन्यांवर विश्वास ठेवून ही औषधे विक्रीसाठी ठेवतात. वास्तविकरित्या ज्या कंपन्या अशी बनावट औषधे निर्माण करून ती बाजारात आणतात, त्यांच्यावर कठोर कारवाई होणे गरजेचे आहे. राज्य शासनाने यासाठी पुढाकार घेऊन बनावट कृषी बी बियाणे औषधे निर्मिती करणार्या कंपन्यांवर कठोर कारवाई करावी. तरच शेतकर्यांची होणारी आर्थिक लूट थांबेल. राज्य शासनाने यासाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी यावेळी आ. घोरपडे यांनी केली.