

कोरेगाव : कोरेगाव शहरात सर्वत्र रिमिक्स काँक्रीटचे रस्ते तयार करण्यात आले आहेत. शहराचा मूलभूत विकास करत असताना आता शहराच्या विशेष करून सुभाषनगर परिसराच्या सुशोभीकरणाकडे विशेष लक्ष दिले जाणार आहे. त्याचबरोबर वाहतूक व्यवस्था सुरळीत करून कोरेगाव शहारासह तालुक्यातील जनतेचे जीवनमान उंचविण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत, अशी माहिती आमदार महेश शिंदे यांनी दिली.
कोरेगाव- रहिमतपूर रस्त्यावर सुभाषनगर येथे मॅफको कंपनीसमोर नव्याने ट्रॅफिक सर्कलची उभारणी केली जाणार आहे. त्याची पाहणी आमदार शिंदे यांनी केली. त्याप्रसंगी पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते. जिल्हा नियोजन समितीचे सदस्य राहूल बर्गे, कोरेगाव विकास आघाडीचे अध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष प्रशांत उर्फ राजाभाऊ बर्गे, माजी उपनगराध्यक्ष सुनीलदादा बर्गे, माजी नगरसेवक महेश बर्गे, सचिनभैय्या बर्गे, नगरसेवक साईप्रसाद बर्गे, सागर बर्गे, संतोष बर्गे, रशीद शेख, दीपक कांबळे, दीपक फाळके, संतोष कदम, शिवलिंग बर्गे, विजय जगताप, दुष्यंतराजे शिंदे फाकडे यांच्यासह कोरेगाव विकास आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते.
वाढती वाहतूक आणि परिसरातील गरज लक्षात घेऊन सुभाषनगर चौक आता विस्तारित केला जात आहे. कोरेगाव रहिमतपूर रस्ता आणि कोरेगाव सुलतानवाडी रस्ता यासह या चौकातून थेट कठापूर जिहे या बाजूला जाण्यासाठी स्वतंत्र 40 फुटी नवीन रस्ता तयार केला जात आहे. ट्रॅफिक आयलँड आणि सर्कल यामुळे वाहतूक सुरळीत राहणार आहे. या भागातील लोकांना वाहतुकीची कोणतीही समस्या भासू नये यासाठी ठोस उपाययोजना केल्या जाणार आहेत, असेही आ. शिंदे यांनी स्पष्ट केले.
सार्वजनिक बांधकाम विभाग, कोरेगाव नगरपंचायत, महावितरण कंपनीचे अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते. सुमारे पाऊण तास आमदार शिंदे यांनी परिसराची पाहणी करून नव्याने तयार केल्या जाणार्या ट्रॅफिक आयलँड आणि सर्कलच्या आराखड्याची बारकाईने पाहणी करत आवश्यक ते बदल सुचविले.
ग्रामीण भागाला मिळणार दिलासा : सुनील बर्गे
सुभाषनगर येथून थेट कठापूर आणि जिहे हा रस्ता तयार केला जात आहे. नव्याने मध्यवर्ती प्रशासकीय इमारत आणि श्रीदुर्गा देवी मंदिर यापासून मधोमध तयार केल्या जात असलेल्या या नवीन रस्त्यामुळे कुमठे, एकंबे, गोळेवाडी, सुलतानवाडी, एकसळ, पासून शिरढोण ते कठापूर परिसरात होणारी वाहतूक व्यवस्थित आणि सुरळीत होणार आहे. ग्रामीण भागाला वाहतूक कोंडीत न अडकता थेट नवीन रस्ता उपलब्ध झाल्याने या भागाचा विकास होणार आहे. शालेय विद्यार्थ्यांपासून वयोवृद्ध नागरिकांना त्यामुळे दिलासा मिळेल, असा विश्वास सुनीलदादा बर्गे यांनी व्यक्त केला.