

कोरेगाव : मी जर चांगलं काम केलं तर जनता स्वीकारेल, नाही केलं तर घरी घालवेल. मी या गोष्टीचा फार विचार करत नाही. राजकारणात कोणीही ताम्रपट घेऊन येत नाही आणि मी ही आलो नाही. 3 वर्ष माझ्या ताब्यात आहेत तोपर्यंत तळागाळातील जनतेसाठी विकासाचीच कामे करत राहणार, एवढेच मला कळतं, असा इशाराच आ. महेश शिंदे यांनी कोरेगाव येथे पत्रकारांशी बोलताना दिला.
कोरेगावमध्ये तुमची ताकद कमी झालीयं असे वाटते का? या पत्रकारांच्या प्रश्नावर बोलताना आ. महेश शिंदे म्हणाले, आत्ताची टंचाई आढावा बैठक बघा, उपस्थितांची संख्या पहा आणि हा प्रश्न तुम्ही जनतेलाच विचारा, तेच त्याचे समर्पक उत्तर देऊ शकतील.
मंत्री शंभूराज देसाई यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेना शाखा ओपनिंग झालं, तुमच्या जवळच्याच कार्यकर्त्यांनी शिवसेनेत जाऊन शड्यु ठोकला आहे, या पत्रकारांच्या प्रश्नावर उत्तर देताना आ. महेश शिंदे म्हणाले की, मला असं वाटत नाही. पालकमंत्री पक्ष वाढवायचं काम करत आहेत, ही चांगलीच गोष्ट आहे. त्यांना माझं सहकार्यच असणार आहे.
संजय शिरसाट म्हटल्याप्रमाणे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तुमच्यावर कटू कारवाई करणार आहेत, याकडे पत्रकारांनी लक्ष वेधले असता आ. महेश शिंदे म्हणाले, संजय शिरसाट हा माझा चांगला मित्र आहे. प्रेमातला दोस्त आहे. आम्ही एकत्र काम केले आहे. त्यामुळे बसून आम्ही ठरवू.
शिवसेना शाखा व एक संपर्क कार्यालयाच्या उद्घाटन कार्यक्रमाला जाणं तुम्ही टाळलं, बॅनरवर तुमचे फोटो शिवसैनिकांनी टाळले हे निदर्शनास आणून दिल्यानंतर आ. महेश शिंदे म्हणाले, मी पहिल्यांदाच सांगितले आहे, या ठिकाणी कोणाचाही आयडेंटिफिकेशन नाहीये . तिथे माझे कार्यकर्ते माझे कार्यकर्ते आहेत आणि हे जे होते ते महायुतीचे कार्यकर्ते होते. आज 90 टक्के मतदार संघाच्या ग्रामपंचायती आमच्या ताब्यात आहेत. सगळे कार्यकर्ते समोर उपस्थित होते काही जण असतील त्यांच्यासोबत काही अडचण नाही. याबाबत आम्ही बसून चर्चा करू.
एकनाथ शिंदे विरुद्ध महेश शिंदे असा संघर्ष पुढील काळात पाहायला मिळणार का? यावर उत्तर देताना आ. महेश शिंदे म्हणाले, कुठलाही संघर्ष वाढला नाही. हा संघर्ष मीडियाने वाढवला आहे. एकनाथ शिंदे हे प्रचंड मोठे व्यक्तिमत्व आहे. माझे पूर्वनियोजित 68 कार्यक्रम होते. त्यामध्ये 42 लग्न 16 सभा शेड्युलमध्ये होत्या. त्यांचा कार्यक्रम अचानक ठरला असेल आणि मला तिथे निरोप नव्हता.