आयुष्यभराची पापे आमच्या नावाखाली लपवू नका : आ. जयकुमार गोरे

रामराजे हे जिल्ह्यातील सर्वाधिक डरपोक नेते
MLA Jayakumar Gore criticized Ramraje
आ. जयकुमार गोरे Pudhari File Photo
Published on
Updated on

खटाव : सत्तेची कवचकुंडले नसतील तर रामराजे दबावाचे आणि दहशतीचे राजकारण करू शकत नाहीत हे समजल्यानेच ते विचलित झाले आहेत. ते जिल्ह्यातील सर्वाधिक डरपोक नेते आहेत. त्यांच्याकडून लोकसभेलाही नव्हती आणि आताही महायुती धर्म पाळण्याची अपेक्षा कुणीच ठेवली नाही. कार्यकर्ते दुसरीकडे आणि हे तिसरीकडे राहणार असल्याचा पोरखेळ त्यांनी सुरु केलाय. आमच्या नावाखाली त्यांनी त्यांची पापे लपवू नयेत. कुणाच्यातरी पदराआडून असल्या चाली खेळणे बंद करावे, असा टोला आ. जयकुमार गोरे यांनी आ. रामराजेंना लगावला.

फलटणमधील एका कार्यक्रमात आ. रामराजेंनी आ. जयकुमार गोरे आणि रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्या सांगण्यावरुन भाजप चालणार असेल तर महायुतीचा प्रयोग यशस्वी होणार नाही, असे वक्तव्य केले होते. त्या वक्तव्याचा समाचार घेताना आ. गोरे म्हणाले, कार्यकर्त्यांना आशीर्वाद देवून रामराजे महायुती सोडून जा, असे सांगत आहेत. ते स्वतः का थांबले आहेत. ते कुणालाच समजत नाही, अशी त्यांची बाळबोध कल्पना आहे. लोकसभेला महायुती तोडली तेव्हा त्यांची निष्ठा कुठे गेली होती. त्यांना महायुतीत मदत कुणी मागितली आहे. यापूर्वी त्यांनी कधी महायुतीला मदत केली आहे? त्यांची आणि आमची लढाई आजची नाही. 2007 सालापासून आम्ही सत्तेत नसताना, आमच्याकडे काही नसताना न रडता आम्ही ही लढाई लढत आलो आहोत. नेहमी काड्या आणि जाळ घालणारे रामराजे सत्तेत असताना, सभापती असताना त्यांनी आमच्यावर अनेक केसेस घातल्या पण आम्ही त्यांना कधी यशस्वी होवू दिले नाही.

आ. गोरे पुढे म्हणाले, सत्ता असली की प्रशासनाला हाताशी धरुन दबाव आणि दहशतीचे राजकारण करणारे रामराजे आता विचलित झाले आहेत. सत्तेची कवचकुंडले नसतील तर रामराजे जिल्ह्यातील सर्वाधिक कमजोर नेते आहेत. त्यांना दोन्ही डगरीवर पाय ठेवून पोळी भाजायची असल्यानेच आमचे नाव घेऊन त्यांनी केलेली पापे लपवायचा प्रयत्न सुरु आहे. ते असले उद्योग करुन जिल्ह्यात स्वतःचे हसे करुन घेत आहेत, असे त्यांचेच बगलबच्चे सांगू लागले आहेत, असेही आ. गोरे म्हणाले.

औरंगजेबनीती बंद करा...

हरियाणामधील निकालानंतर रामराजेंचे ‘चीत भी मेरी अन् पट भी मेरी’, असे राजकारण सुरु झाले आहे. महाराष्ट्रात कुणाचीही सत्ता आली तरी आपण सत्तेबरोबर राहावे म्हणून ते चाली खेळत आहेत. आपण एकीकडे आणि कार्यकर्ते दुसरीकडे अशी औरंगजेबनीती त्यांनी बंद करावी, असेही आ. गोरे म्हणाले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news