Atulbaba Bhosale | उड्डाणपुलासह महामार्गाच्या कामाबाबत आमदार अतुलबाबा विधानसभेत कडाडले

एप्रिल 2026 पर्यंत काम पूर्ण करण्याचे नियोजन
Atulbaba Bhosale |
Atulbaba Bhosale | उड्डाणपुलासह महामार्गाच्या कामाबाबत आमदार अतुलबाबा विधानसभेत कडाडले(Pudhari Photo)
Published on
Updated on

कराड : पुणे - बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील सातारा ते कागलदरम्यान सुरू असणारे सहा पदरीकरणाचे काम संथ गतीने सुरू आहे. दोनदा मुदतवाढ देऊनही काम पूर्ण होऊ शकले नाही. अपघातात 50 हून अधिक लोकांचे प्राण गेले आहेत. वाहन चालकांच्या सुरक्षिततेबाबत सूचना करून सुद्धा ठेकेदार कंपनी दुर्लक्ष करत आहे याबाबत संताप व्यक्त करत कराड दक्षिणचे आमदार डॉ. अतुलबाबा भोसले गुरुवारी विधानसभेत कडाडले. ठेकेदार कंपनीला मुदतवाढ न देता सक्त सूचना केली जावी, अशी मागणी आमदार अतुलबाबा यांनी विधानसभेत केली.

पुणे - बंगळूर महामार्गाचे सहापदरीकरणाचे काम जानेवारी 2023 पासून सुरू आहे. कराडजवळील सुमारे साडेतीन किलोमीटर लांबीच्या उड्डाण पुलासह कागल ते सातारा यादरम्यान संथ गतीने काम सुरू आहे. या कामाला दोनदा मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यानंतरही काम पूर्ण होऊ शकले नाही. ठेकेदार कंपनी कर्मचार्‍यांना वेळेवर पगार देत नाही आणि त्यामुळे कर्मचारी संप करतात.

त्यामुळे महामार्गाच्या सहापदरीकरणाचे काम केव्हा पूर्ण होणार ? असा प्रश्न उपस्थित करत ठेकेदार कंपनीला सक्त सूचना करावी अशी मागणी आमदार अतुलबाबा भोसले यांनी गुरुवारी विधानसभेत केली. सन 2021 पासून जून 2025 पर्यंत 111 अपघात एकट्या कराड शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत झाले आहेत. या अपघातात 50 लोकांचा बळी गेला असून शेकडो लोक जायबंदी झाले आहेत. 18 जानेवारी 2025 रोजी महामार्गाच्या विषयावर बैठक घेत 27 धोकादायक ठिकाणी आवश्यक ती उपाययोजना करत वाहन चालकांची व प्रवाशांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देण्याची सूचना करण्यात आली होती. मात्र त्यानंतरही आजवर ठेकेदार कंपनीकडून वाहन चालकांच्या सुरक्षिततेकडे दुर्लक्षच केले जात असल्याबाबत आमदार अतुलबाबा यांनी तीव्र शब्दात आपल्या भावना व्यक्त केल्या.

कागलपर्यंत 48 टक्के, तर पेठपर्यंत 71 टक्के काम

राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी आमदार अतुलबाबा यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाचे उत्तर देताना सभागृहात कागल ते पेठ नाकादरम्यान 48 टक्के, तर सातारा ते पेठ नाकादरम्यान 71 टक्के काम पूर्ण झाल्याची माहिती सभागृहात दिली. महामार्गाच्या सहापदरीकरणाचे काम राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून सुरू असून त्यांच्याशी यापूर्वीच या विषयावर चर्चा झाली आहे. एप्रिल 2026 पर्यंत हे काम पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यापूर्वीच आपण ठेकेदार कंपनीला सक्तपणे सूचना केल्या असून आता पुन्हा एकदा ठेकेदार कंपनीला सूचना केली जाणार असल्याची ग्वाही मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी विधानसभेत दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news