

लोणंद : लोणंद नगरपंचायत हद्दीत मियावाकी गार्डन तयार करण्याबाबतचा ठराव मंजूर करण्यात आला आहे. त्यानुसार शहरातील गायरान क्षेत्रातील 1 हेक्टरवर जापनीज पध्दतीचे उद्यान उभारण्यात येणार आहे. हा पर्यावरण रक्षणासाठी आणि जैवविविधता वाढवण्यासाठी एक महत्त्वपूर्ण उपक्रम ठरणार आहे. या कामासाठी ना. मकरंद पाटील यांच्या माध्यमातून 7 कोटी 32 लाख 50 हजार रूपयांचा निधी मंजूर झाल्याची माहिती नगराध्यक्षा मधुमती गालिंदे व उपनगराधृयक्ष गणीभाई कच्छी यांनी नगरपंचायतीच्या वार्षिक सभेत दिली.
सभेसाठी नगरसेविका सौ.सुप्रिया शेळके, सौ. दिपाली संदीप शेळके, सौ. दिपाली निलेश शेळके, भरत शेळके, सौ. राजश्री शेळके, सौ. ज्योती डोनीकर, नगरसेवक सचिन शेळके, शिवाजीराव शेळके, सौ. सीमा खरात, भरत बोडरे, रशीदा इनामदार, सौ. तृप्ती घाडगे, प्रविण व्हावळ, रविंद्र क्षीरसागर, सागर शेळके, आनंदराव शेळके -पाटील यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.
अग्निशामक केंद्रासाठी जागा निश्चित करण्यात आली असून पावणे दोन कोटींचा निधी मंजूर झाला आहे. तसेच लोणंद रेल्वे स्टेशनला भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे नाव देणे, प्रभाग क्र.11 मध्ये शास्त्री चौक येथे वॉटर एटीएम बसवणे, प्रभाग क्र. 15 मधील प्रसूतिगृहशेजारील जागेत बगीचा विकसित करणे, शहरात टंचाई घोषित करणे आदी ठराव करण्यात आले. तसेच जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) व अनु. जाती उपघटक योजना सन 2025-26 अंतर्गत विविध विकास कामे निश्चित करण्याचा अधिकार नगराध्यक्षांना देण्यात आला. दरम्यान, या सर्व विकासकामांमुळे लोणंदचा सार्वजनिक वाहतूक, स्वच्छता, पर्यावरण व नागरी सुविधा क्षेत्रात विकास होणार असल्याचे नगराध्यक्षा मधुमती गालिंदे यांनी दिला.
मियावाकी पद्धतीने लावलेली झाडे पारंपरिक वृक्षारोपणाच्या तुलनेत 10 पट जलद वाढतात आणि 2-3 वर्षांत दाट जंगल निर्माण होते. अशा उद्यानामुळे हवामान सुधारते, प्रदूषण नियंत्रणात मदत करते, पावसाचे पाणी मुरवते आणि भूगर्भातील जलस्तर स्थिर ठेवते. स्थानिक पक्षी, फुलपाखरे व कीटकांसाठी हे एक सुरक्षित अधिवास बनेल. यामुळे शाळा, महाविद्यालये व नागरिकांना नैसर्गिक शिक्षणाची संधी मिळेल आणि एक निसर्गसंपन्न पर्यटनस्थळही निर्माण होईल.