

पिंपोडे बुद्रुक : माझे संपूर्ण राजकीय जीवन मी पाणी प्रश्नासाठी खर्ची घातले आहे. कोणताही प्रश्न सहा महिने-एका वर्षात सुटत नाही. त्यासाठी सातत्याने पाठपुरावा करावा लागतो. आजकाल मी केलं म्हणून लबाड लोकं जनतेची दिशाभूल करत आहेत. फलटणचा सुरळीत चाललेला संसार अनेकांना बघवत नाही. एका पराभवाने खचून जाणारी आम्ही माणसं नाही, हे लक्षात ठेवा. अशी टीका आ. रामराजेंनी केली. दरम्यान, उत्तर कोरेगाव तालुक्याचा शेती पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवायचा असेल तर रस्त्यावर उतरून संघर्ष करावा लागेल, असेही रामराजे म्हणाले.
घिगेवाडी, ता. कोरेगाव येथील कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी माजी आमदार दिपक चव्हाण, सरपंच नारायण सावंत, आदिनाथ सावंत, भास्कर घिगे यांची प्रमुख उपस्थिती होती. आ. रामराजे म्हणाले, तुमची पाण्यासाठी चाललेली तळमळ मला दिसत आहे. त्यासाठी प्रस्तावित सोळशी धरणातील किमान तीन टीएमसी पाणी आपल्याला प्राधान्याने मिळायला हवे. त्यासंदर्भात बैठक लावून प्रश्न मार्गी लावू. मात्र कोणतीही गोष्ट सहज मिळत नाही. याशिवाय हक्क मिळवण्यासाठी रस्त्यावर उतरण्याची तयारी ठेवावी लागते. गरज पडल्यास तुमच्यासोबत मी ही संघर्ष करेन. आता वय झालंय हे खरं आहे. पण डोकं अजून चालतंय, त्यामुळे तुम्ही काळजी करू नका, असा सूचक इशारा ही त्यांनी विरोधकांना दिला. यावेळी पिंपोडे बुद्रुक, सोनके, सोळशी, रणदुल्लाबाद, करंजखोप, वाघोली, सर्कलवाडी, वाठार स्टेशन, तडवळे सं.वाघोलीसह परिसरातील पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.