Child Marriage Case | अल्पवयीन मुलीचा जबरदस्तीने विवाह
कराड : कोपर्डे हवेली (ता. कराड) परिसरातील एका अल्पवयीन मुलीचा गत महिन्यात जबरदस्तीने विवाह लावला होता. पण संबंधित मुलीने कराड तालुका पोलीस ठाण्यात धाव घेतल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी कराडसह गगनबावडा ( जि. कोल्हापूर) तालुक्यातील संशयितांविरोधात गुन्हा नोंद झाला आहे. संशयितांमध्ये मुलीच्या आई-वडिलांसह पती, सासू, सासरा तसेच अन्य 4 संशयितांचा समावेश आहे.
संबंधित मुलीच्या तक्रारीनुसार, 12 जूनला कोथळी (ता. गगनबावडा, कोल्हापूर) परिसरातील एक मुलगा या मुलीला पाहण्यासाठी आला होता. त्यावेळी आपण अल्पवयीन असून आपले लग्न करू नका असे संबंधित मुलीने आई-वडिलांना सांगितले होते. त्यावेळी लग्न दोन वर्षानंतर केले जाणार असून साखरपुडा करावा लागेल असे धमकावलेे. मात्र त्यानंतरही त्याच दिवशी दुपारी तीनच्या सुमारास कोपर्डेतील भटजीला बोलावून थेट लग्न लावण्यात आले.
लग्नानंतर 1 जुलैला संबंधित मुलगी मित्रासह थेट कराड तालुका पोलीस ठाण्यात दाखल झाली. पोलिसांनी अल्पवयीन मुलीचे जबरदस्तीने लग्न लावणार्या आई-वडिलांसह पती, सासू-सासरा यांच्यासह भटजी, लग्नास कारणीभूत असणारा मध्यस्थी, नणंद, नणंदेचा नवरा अशा कराड व गगनबावडा तालुक्यातील 9 संशयितांविरोधात तक्रार दाखल केली आहे. सर्व संशयितांना चौकशीसाठी बोलावण्यात आल्याची माहिती पोलिस निरीक्षक महेंद्र जगताप यांनी दिली आहे.
वयाचा पुरावा नसल्याने होती अडचण...
संबंधित मुलीच्या वयाचा कोणताही पुरावा उपलब्ध नव्हता. त्यामुळे पोलिसांनी संबंधित मुलीची वैद्यकीय तपासणी केली होती. या तपासणीचा अहवाल पोलिसांना मंगळवारी उशिरा प्राप्त झाला. त्यानंतर गुन्हा नोंद केला.

