Jaykumar Gore | पालखी तळांसाठी भरीव निधी देणार : ना. जयकुमार गोरे
लोणंद : श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यातील वारकरी व भाविकांना सोयी सुविधा देण्यासाठी राज्य शासनाच्या वतीने भरीव निधी उपलब्ध करून दिला जात आहे. प्रशासनाच्या वतीने चांगल्या प्रकारचे नियोजन करण्यात येत आहे. पालखी तळांसाठी भरीव निधी देणार असून सर्वांनीच वारकर्यांची सेवा करून पालखी सोहळा यशस्वी करूया, असे आवाहन ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांनी केले.
श्री संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा चार दिवसांच्या मुक्कामासाठी दि. 26 जून रोजी सातारा जिल्ह्यात येत असून लोणंद येथे एक दिवसाच्या मुक्कामासाठी येत आहे. या पालखी तळाची पाहणी करताना ना. जयकुमार गोरे बोलत होते. यावेळी आ. सचिन पाटील, जिल्हाधिकारी संतोष पाटील, जिल्हा पोलिस प्रमुख तुषार दोशी, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, प्रांताधिकारी राजेंद्र कचरे, पोलिस उपअधीक्षक राहुल धस, तहसिलदार अजित पाटील, गटविकास अधिकारी अनिलकुमार वाघमारे, सपोनि सुशील भोसले, ज्येष्ठ नेते आनंदराव शेळके पाटील, नगराध्यक्ष मधुमती गालिंदे, उपनगराध्यक्ष गणीभाई कच्छी, मुख्याधिकारी दत्तात्रय गायकवाड, नगरसेवक शिवाजीराव शेळके, सचिन शेळके, रवींद्र क्षीरसागर, सागर शेळके, सागर गालिंदे, बंटी खरात, ऋषिकेश धायगुडे पाटील, हर्षवर्धन शेळके, राहुल घाडगे, बापूराव धायगुडे, रविराज भोसले, भाऊसाहेब शेळके, तेजस क्षीरसागर, श्रीधर सोनवलकर, गणेश गुंडगे उपस्थित होते.
ना. जयकुमार गोरे म्हणाले, पालखी मार्गावरील पालखीतळांची पाहणी केली असता अनेक ठिकाणी पावसाचे पाणी साचले आहे. त्यामुळे या ठिकाणी पुन्हा पालखीतळ निर्माण करावा लागणार आहे. शौचालयाचे योग्य ते नियोजन करावे लागणार आहे. पालखीतळावर ज्या सुविधा निर्माण करायच्या आहेत त्या करण्याचा प्रयत्न प्रशासनाच्यावतीने केला जात आहे. यंदा पाऊस जास्त सांगितला आहे. त्यामुळे शासनाच्यावतीने वारीच्या वाटेवरील गावात वारकर्यांना निवारा निर्माण केला जाणार आहे. सुमारे 7 लाख स्क्वेअर फुटाचे निवारा हँगर उभे केले जाणार आहेत.
त्यामध्ये लाखो वारकर्यांची मुक्काम, अंघोळ व शौचालयाची सोय होणार आहे. लोणंदला एक दिवस मुक्काम आहे, त्यामुळे भाविकांची मोठी गर्दी होणार आहे. त्यासाठी पोलिस प्रशासनाच्यावतीने दोन ऐवजी तीन दर्शन रांगा करण्याचे नियोजन केले जाणार आहे. दिवसेंदिवस पालखी सोहळ्याचे स्वरुप वाढत चालल्याने पालखी तळ अपुरे पडत आहेत. त्यासाठी नव्याने पालखी तळ निर्माण करून त्या ठिकाणी कायम स्वरूपी सुविधा निर्माण केल्या जाणार आहेत. लोणंदच्या प्रस्तावित 25 एकर जागेवरील पालखी तळासाठी शासनाच्या वतीने सर्वतोपरी सहकार्य केले जाणार आहे .

