

कलेढोण : ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांचे समर्थक असलेल्या खटाव तालुक्यातील धोंडेवाडीतील अनेक कार्यकर्त्यांनी मंत्री गोरेंच्या कार्य पद्धतीवर नाराजी व्यक्त करत भाजपला सोडचिठ्ठी दिली. सुमारे पन्नास प्रमुख कार्यकर्त्यांनी युवा नेते सुरेंद्र गुदगे यांच्या गटात घरवापसी केली. आगामी काळात संघर्ष वाट्याला आला तरी स्वाभिमानाने वाटचाल करायची, असे आवाहन सुरेंद्र गुदगे यांनी यावेळी केले.
गुदगे गटात घरवापसी केलेल्या कार्यकर्त्यांचा मेळावा धोंडेवाडी येथील हायस्कूलच्या पटांगणावर आयोजित केला होता. त्यावेळी सुरेंद्र गुदगे यांनी घरवपासी केलेल्या सर्व कार्यकर्त्यांचे स्वागत व कौतुक केले. उशिरा का होईना कार्यकर्त्यांना जाग आल्याचे स्पष्ट करून सुरेंद्र गुदगे म्हणाले, स्वर्गीय भाऊसाहेब गुदगे यांनी खटाव व माणसाठी उरमोडीचे पाणी राखून ठेवले. त्यामुळेच आज दुष्काळी पट्ट्यात पाणी खळाळत आहे. मात्र, आपणच पाणी आणल्याच्या अविर्भावात अनेकजण पाण्यात उभे राहून फोटो काढत आहेत. स्वर्गीय भाऊसाहेब गुदगे आणि माझ्या राजकीय जडणघडणीत धोंडेवाडीकरांनी मोठी साथ दिली आहे. आपल्या हक्काचे पाणी मिळण्यास किती त्रास सहन करावा लागत आहे. लोकप्रतिनिधींच्या किती मिणत्या करायच्या? तरीही ते सापत्न भावाचीच वागणूक देत आहेत. म्हणून आपण सर्वांनी स्वाभिमानाने जगूया. त्यासाठी आवश्यक तो संघर्ष करू. पण त्यांचे मांडलिकत्व स्वीकारायचे नाही. असा निर्धार त्यांनी केला.
खटाव तालुक्यातील सर्व नेतृत्व संपवून माण तालुक्याचे मांडलिकत्व स्वीकारायला लावण्याचा घाट घातला जात आहे. तरीही आम्ही स्वाभिमानाने वाटचाल करणार. संघर्ष करणार पण भीक घालणार नाही. माझ्यासारख्या स्वाभिमानाने राहणाऱ्या कार्यकर्त्यांना टार्गेट केले जात आहे. पण आम्ही घाबरणारे नाही. कोणी कितीही मोठा असो. मंत्री असो आमदार त्याला घाबरू नका. तुमच्या केसालाही धक्का लागल्यास सुरेंद्र गुदगे जबाबदारी घेईल. तुमची हाक मायणीत ऐकू जाईल. बोराटवाडीत नाही. त्यामुळे माझ्यासारखे कोट्यवधी रुपयांची विकासकामे करणारे नेतृत्व जपायचे की उपऱ्याचे पाय धरायचे याचा विचार करा. आगामी जिल्हा परिषदेची निवडणूक ही 2029 च्या विधानसभेची पायाभरणी असेल. खटाव तालुक्याचा पुन्हा स्वतंत्र विधानसभा मतदार संघ होईल, असा दिलासाही गुदगे यांनी दिला.