

सातारा : छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील गड, किल्ल्यांची जोपासना व्हावी, तिथे स्वच्छता रहावी, त्यांचे सौंदर्य अबाधित रहावे यासाठी जयहिंद गणेशोत्व मंडळ आणि मावळा फौंडेशनने पुढाकार घेत गड, किल्ला स्वच्छता मोहीम सुरु केली आहे. या मोहिमेचा प्रारंभ रायगड किल्ल्यापासून करण्यात आला. मंत्री भरत गोगावले यांनी उपस्थित राहत या मोहिमेला पाठिंबा दिला. तसेच गड, किल्ले संर्वधनासाठी सहकार्य करण्याची गावही त्यांनी दिली.
लोकमान्य टिळकांनी ज्या हेतूने गणेशोत्सव सुरु केला तो वारसा सातार्यातील शनिवार चौक, 501 पाटी येथील जयहिंद गणेशोत्सव मंडळ चालवत आहे. या मंडळाच्यावतीने नेहमीच विविध सामाजिक आणि नाविन्यपूर्ण, समाजाला दिशा देणारे उपक्रम राबवले जातात. मंडळाने आता गड, किल्ल्याची स्वच्छता करण्याचा उपक्रम सुरु केला असून त्याला मावळा फौंडेशनची साथ मिळाली आहे. मोहिमेचा प्रारंभ रायगड किल्ल्यापासून झाला. त्यासाठी मंगळवारी सातार्यातून 30 ते 40 पदाधिकारी आणि लहान तसेच ज्येष्ठ कार्यकर्ते रायगड किल्ल्याकडे रवाना झाले होते. रायगड किल्ल्यावर पोहचून या परिसरातील कचरा, प्लास्टिकच्या बाटल्या गोळा करण्यात आल्या. तसेच स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेला मंत्री भरत गोगावले यांनी उपस्थित राहत पाठिंबा दिला.
यावेळी बोलताना ना. गोगावले म्हणाले, रायगड हा किल्ला समस्त शिवप्रेमींची अस्मिता असून मावळा फौंडेशन आणि जयहिंद गणेशोत्सव मंडळाने राबवलेला उपक्रम स्तुत्य आहे. स्वराज्याच्या शेवटची राजधानी सातार्यातून येऊन हा उपक्रम राबवणे कौतुकास्पद आहे. यापुढे काही गरज लागल्यास आम्ही पाठीशी आहोत, अशी ग्वाहीही ना. गोगावले यांनी दिली. यावेळी प्रदीप वाघमळे, अनिल जठार, प्रशांत वांकर, बिपीन दलाल, प्रमोद मुळे, विनय नागर, निलेश पंडित, विशाल धबधबे उपस्थित होते.