

सातारा : दूध डेअर्या ते दूध संघाच्या साखळीत शितकरण केंद्रे हा मधला टप्पा अलिकडच्या काळात निर्माण झाला. तांत्रिकदृष्ट्या दूध थंड ठेवण्यासाठी ही व्यवस्था असली तरी याच व्यवस्थेमध्ये भेसळखोरी आणि नोंदीमध्ये घोटाळे केले जात आहेत. गलेलठ्ठ कमिशन आणि भेसळीसाठी कुलर पॉईंट हा दूध वितरणातील नवा टप्पा दूध सम्राटांनी सुरू केल्याचे दिसते. अलिकडे दूध शितकरण केंद्रचालकांचा बेजबाबदारपणा वाढला आहे. भेसळखोरीतील कडी बनलेली ही दूध शितकरण केंद्रांची खरंच आवश्यकता आहे का? असा सवाल केला जात आहे.
ग्रामीण भागात दूध डेअर्या ते दूध संघ असे दूध संकलन करणे शक्य आहे. तंत्रज्ञान, दळणवळण आणि पायाभूत सुविधांमध्ये प्रचंड प्रगती झाल्याने त्यादृष्टीने अन्न व औषध प्रशासनाने यावर दूध शितकरण केंद्रे बंद करण्याबाबत विचार करणे आवश्यक आहे. दूध डेअर्यांवरच लहान आकाराचे बल्क मिल्क कुलर (बीएमसी) बसवले तर दूध त्याच ठिकाणी थंड केले जाऊ शकते. हेच दूध थेट टँकरने दूध संघाकडे जाऊ शकते. कुलर पॉईंट किंवा शितकरण केंद्रे हा टप्पाच काढून टाकला तर दूधातील भेसळ टाळता येऊ शकते. शेतकर्यांच्या दूधाच्या कमिशनवर पोट भरणार्या या कमिशन एजंटांची खाबुगिरी बंद केली तर दूध उत्पादक शेतकर्यांचा फायदा होऊ शकतो.
दूध उत्पादक शेतकर्यांच्या दूधास दर मिळून ग्राहकांना भेसळमुक्त दूध उपलब्ध होण्यास मदत होऊ शकते. दूग्ध उत्पादनात अग्रेसर असलेल्या गुजरात, पंजाब यांसारख्या राज्यांमध्ये ही पद्धत यशस्वीपणे राबवण्यात आली असून एका जगप्रसिद्ध दूध संघाने दूध संकलन ते प्रक्रिया केंद्रे यावर केलेल्या मॉडेलवर दूध साम्राज्य उभे केले आहे. त्यामुळे दूध शितकरण केंद्रे बंद करण्याबाबत अन्न व औषध विभागाने विचार करावा, अशी मागणी दूध उत्पादक शेतकर्यांतून होत आहे.
दूध वितरणातील शितकरण केंद्रे (कूलर पॉईंट) ही भेसळखोरांची साखळी बंद केल्यास शेतकर्यांचा आर्थिक फायदा होऊ शकतो. दूध संघांकडून किंवा मोठ्या दूध वितरकांकडून शितकरण केंद्रचालकांना दिले जाणारे कमिशन व प्रक्रिया शुल्क वाचवून त्याचा लाभ शेतकर्यांना देता येऊ शकतो. दूध शितकरण केंद्रे बंद झाल्यास दूधाचे वजन, गुणवत्ता नोंदीतील घोटाळे थांबून शेतकर्यांच्या दुधाची नोंद थेट दूध संघ किंवा संबंधित दूध वितरक करू शकतात. कूलर पॉईंट ही मधली साखळी काढून टाकल्यास दूध नोंदीत हेराफेरीला अजिबात वाव राहणार नाही. गुणवत्तेच्या नोंदीत पारदर्शकता राहणार असल्याने शेतकर्याच्या दुधाला खरा दर मिळू शकतो. मधल्या साखळीतील आर्थिक व्यवहार कमी झाल्याने दूध संघाकडून थेट शेतकर्यांच्या खात्यात पैसे जमा होऊ शकतात.
दूध शितरण केंद्रांसारखे दूध वितरणातील टप्पे कमी करून थेट पुरवठा व्यवस्थेत ग्राहकांचा सर्वाधिक फायदा आहे. दूध शितकरण केंद्रे हटवल्यास भेसळीचा एक महत्त्वाचा टप्पा कमी होऊन दुधाची गुणवत्ता राखण्यास मदत होणार आहे. मधल्या साठवणुकीचा वेळ वाचल्याने ताजे व स्वच्छ दूध ग्राहकांना उपलब्ध होणार आहे. दूध संकलन ते दूध वितरणाच्या थेट साखळीत कोणत्या संकलन केंद्रावरून दूध आले, हे सहज ओळखता येणार असल्याने भेसळ नेमकी कुठे झाली हे लगेच समजण्यास मदत होणार आहे.
दूध शितकरण केंद्रासारखी मधील साखळी कमी झाल्यास खर्च कमी होऊन दुधाच्या किंमती ग्राहकांना परवडतील, अशा राहू शकतात. त्यामुळे अन्न व औषध प्रशासनाने दूध डेअर्या, दूध शितकरण केंद्रे, दूध संघ आणि वितरण केंद्र अशा चार-चार टप्प्यांवर तपासणी करावी लागते. या विभागाकडे मनुष्यबळ कमी असून तपासणीसाठी आवश्यक उपकरणे व साधनांची वानवा आहे. शितकरण केंद्रे बंद केल्यास अन्न, औषध प्रशासनाला तपासणीवर फोकस करता येईल व काम अधिक प्रभावी होईल. तसेच मनुष्यबळाचा अपव्यय टाळता येईल. दूध वितरणातील दूध शितकरण केंद्राची साखळी कमी झाल्याने इतर पदार्थांची अधिक तपासणी करणे शक्य होईल.
भेसळ आढळल्यास संबंधितावर जबाबदारी निश्चित करता येईल. दूध शितकरण केंद्र ही काळाच्या ओघात निर्माण झालेली अनावश्यक व भ्रष्टाचाराला पोषक असलेली भेसळबाजांची व्यवस्था झाली आहे. दूध डेअरी ते दूध संघ अशी व्यवस्था निर्माण केल्यास ती शेतकरी, ग्राहक व प्रशासनाच्या हिताची ठरू शकते. जिल्ह्यातील दूध शितकरण केंद्रे बंद करून भेसळीचा अड्डा उद्ध्वस्त करावा, अशी मागणी होत आहे.