

सातारा : पाच मराठा बटालियनचे ऑननरी कॅप्टन मारूती लक्ष्मण मोरे (निवृत्त) यांच्या धाडसाचे अनेक किस्से असून त्यांच्या धडाकेबाज कामगिरीमुळे अतिरेक्यांना कापरं भरायचं. राजापुरी ता. सातारा हे त्यांचे गाव. मारूती मोरे यांना सन 2003 मध्ये सेना मेडलने गौरवले होते. त्याला कारणही तसेच होते.
17 राष्ट्रीय रायफल्समध्ये पुंछ सेक्टर येथे त्यांच्या नेतृत्वाखालील एका ऑपरेशन मोहिमेत मक्याच्या शेतात घुसून सहा अतिरेक्यांना यमसदनी धाडले होते. त्यांच्या या थरारक मोहिमेची दखल घेवूनच त्यांना गौरवण्यात आले होते. त्यांच्या कार्याला ऑपरेशन सिंदूर मोहिमेमुळे उजाळा मिळत आहे.
मारुती मोरे यांनी मराठा बटालियनसोबत 1987 मध्ये 3 वर्षे श्रीलंका देशात शांती सेनेसाठी त्यांच्या सैनिकाबरोबर काम केले. 1990 ते 2000 या कालावधीत त्यांनी ग्वाल्हेर, लेह, चीन सीमेवर तांगसे, पुणे, मणिपूर आदी ठिकाणी काम करुन सैन्याची प्रतिमा उंचीवर नेण्याचा प्रयत्न केला आहे. सन 1999 मध्ये कारगिल युध्दातही 5 मराठा बटालियनमध्येही सहभागी झाले होते. त्यानंतर ते 2007 ते 2008 या एक वर्षासाठी युएनमध्ये शांती सेनेत सहभागी झाले होते. त्यांनी लष्करी सेवेत असताना अनेक मोहिमा यशस्वी केल्या आहेत.
मारुती मोरे यांच्या सैन्यदलातील कर्तबगारीचे अनेक किस्से आहेत. त्यांच्या नेतृत्वाखालील सैनिकांच्या अनेक मोहिमा फत्ते झाल्या आहेत. पुंछ सेक्टरमधील अराई गावालगत 29 संप्टेंबर 2001 मध्ये रात्री 9.30 वाजता मक्याच्या शेताजवळ जवानांनी सापळा लावला होता. तासाभरात एक अतिरेकी 100 मीटर अंतराजवळून पाऊल वाटेने जाताना दिसला. या अतिरेक्याला शरण येण्यास सांगताच अतिरेक्याने मक्याच्या शेतात लपत अंधाधुंद गोळीबारास सुरुवात केली. गोळीबाराच्या आवाजावरून शेतात अतिरेक्यांची संख्या अधिक असल्याचे लक्षात आले. याचवेळी मक्याच्या शेताला वेढा देऊन एके 47 व रॉकेट लॉन्चरच्या सहाय्याने 17 राष्ट्रीय रायफल्सच्या तुकडीने 6 अतिरेक्यांना यमसदनी धाडले.
या मोहिमेत एकूण 14 जवान सहभागी झाले होते. ही धुमचक्री पहाटेपर्यंत सुरू होती. या तुकडीचे नेतृत्व पाच मराठा बटालियनचे ऑनररी कॅप्टन मारुती लक्ष्मण मोरे यांनी केले होते. त्यांच्या या अत्युच्च अशी धाडसी कामगिरी सांगताना आजही त्यांच्या अंगावर शहारे येत आहेत. मारुती मोरे यांच्या धाडसी कार्यासाठी सन 2003 मध्ये सेना मेडल देवून त्यांचा गौरव केला होता. ऑपरेशन सिंदूरच्या निमित्ताने भारतीय सैन्याच्या पराक्रमाच्या गाथा पुन्हा एकदा गायल्या जात आहेत. आता तर अत्यंत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून मुजोर पाकिस्तानला भारताने सळो की पळो करुन सोडले आहे.