

फलटण : पाण्यावरून कुणाला काही बोलायचं आहे ते बोलू द्या. मी मात्र बोलण्यापेक्षा उत्तर कोरेगाव, माण, खटावमधील काही भाग पाण्यापासून वंचित आहे तिथं पाणी पोहोचवण्यासाठी काम करतोय. माझे वय विचारता? तुमचे शिक्षण किती? लवाद वाचला का? लवाद माहिती आहे का ? आपण ज्यांचं नेतृत्व मान्य करता आहात त्यांना तरी लवाद माहिती आहे का? हिम्मत असेल तर म्हसवडला नेलेली उत्तर कोरेगावची एमआयडीसी परत आणा तर तुमचे नेतृत्व मान्य करतो, अशी टीका आ. रामराजे ना. निंबाळकर यांनी आ. सचिन पाटील यांच्यावर केली.
पिंपोडे बुद्रुक येथे आयोजित कार्यक्रमानंतर प्रसारमाध्यमांशी ते बोलत होते. आ. रामराजे म्हणाले, मी सत्तेत असताना या महाशयांचा जन्म तरी झाला होता का? कोणालाही काहीही बोलायचं हे त्यांना लागलेलं वळण हे ते ज्या पक्षात आहेत, त्या पक्षाचं नाही तर त्यांनी ज्यांचे नेतृत्व मान्य केले त्यांची ही संस्कृती आहे. 1996 ते 2019 पर्यंत मी सत्तेत होतो. नशीबाने तुम्हाला संधी मिळाली. नकारात्मक कशाला बोलताय. वेळ कमी असून तो वाया नका घालवू. धोम बलकवडीसाठी मी सर्व काही केलंय. खरंतर फलटणच्या आमदारांना काहीच काम राहिलं नाही. जे आवश्यक होतं ते सर्व करून ठेवलं आहे. जे करून ठेवलं आहे तेवढं जरी राखून ठेवलं तरी खूप होईल.
25 वर्षात पाटणचे पाच एम आय टँक, तारळी, उरमोडी, धोम बलकवडी, निरा देवधर या माध्यमातून 120 टीएमसी पाणी जिल्ह्यासाठी लावादाच्या कचाट्यातून वाचवलं. पुनर्वसनाचा प्रश्न सोडवला. तारळी उरमोडीचे श्रेय कोणाच्या काळात पाणी आलं त्यांचे नसून आपला भाग पाण्याखाली बुडवून जिल्ह्याला पाणी मिळावे, असा दूरदृष्टीचा विचार करणार्या कै. अभयसिंहराजे भोसले, विक्रमसिंह पाटणकर यांचे आहे. पाण्यासाठी श्रेयवादाचा अडसर न आणता ज्या भागात पाणी पोहोचले नाही तिथं पाणी पोहोचवण्यासाठी प्रयत्न केले तर त्या भागाला लवकर पाणी पोहोचेल. सत्ताधारी म्हणून मिरवताय तर, इथली उत्तर कोरेगावची म्हसवडला नेहलेली एमआयडीसी परत आणा. विनंती करतो, आवाहनही करतो. आहे का हिम्मत? काम करा, असा टोलाही आ. रामराजेंनी लगावला.
ते ज्यांचं नेतृत्व मानतात त्यांना फलटणचे पाणी बाहेर घेऊन जायचंय! उत्तर कोरेगावच्या पाण्यासाठी मी काही केलं नाही असे तुम्ही सांगून पाणी येणार नाही तर पाण्यासाठी तुम्ही काय करणार आहात ते सांगा? सोळशीचे सहा टीएमसी पाणी कसं आणणार आहात हे सांगितलं असतं तर योग्य ठरलं असतं. पण हे आमदार आता बुद्धिभेद करायला लागलेत, अशी टिकाही आ. रामराजेंनी केली.