Mhaswad Shri Siddhanath : म्हसवडमध्ये श्री सिद्धनाथांचे १२ दिवसांचे ‘उभे नवरात्र’ सुरु

पहाटे चार वाजता कार्तिकस्नान, अनवाणी नगरप्रदक्षिणा : तुलसी विवाहादिवशी शाही विवाह सोहळा
Mhaswad Shri Siddhanath : म्हसवडमध्ये श्री सिद्धनाथांचे १२ दिवसांचे ‘उभे नवरात्र’ सुरु
Published on: 
Updated on: 

म्हसवड : दक्षिण काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या म्हसवडचे ग्रामदैवत आणि लाखो भाविकांचे कुलदैवत श्री सिद्धनाथ व माता जोगेश्वरी यांच्या शाही विवाह सोहळ्याची धामधूम सुरू झाली आहे. दिवाळी पाडव्यापासून तुलसी विवाहापर्यंत चालणाऱ्या पारंपरिक १२ दिवसांच्या अत्यंत कठीण अशा ‘उभ्या नवरात्र’ व्रताला श्री सिद्धनाथ मंदिरात प्रारंभ झाला आहे. या व्रतादरम्यान भाविकांकडून कठोर नियमांचे पालन करुन श्रींची अखंड उपासना केली जात आहे.

माणगंगा नदीच्या तीरावर दहाव्या शतकातील प्राचीन हेमाडपंथी श्री सिद्धनाथ मंदिर आहे. या मंदिरात अनेक धार्मिक परंपरा शतकानुशतके जपल्या जात आहेत. त्यातील ‘उभे नवरात्र’ ही अत्यंत कठीण आणि श्रद्धेची कसोटी पाहणारी उपासना मानली जाते. श्री सिद्धनाथ व माता जोगेश्वरी यांच्या महिनाभर चालणाऱ्या शाही विवाह सोहळ्यात हळदी, विवाह आणि वरात असे पारंपरिक धार्मिक विधी होतात. त्यातील दिवाळी पाडवा ते तुलसी विवाह या १२ दिवसांना विशेष महत्त्व आहे. दिवाळी पाडव्याच्या पहाटे साडेपाच वाजता मुख्य पुजारी व सालकरी यांच्या हस्ते घटस्थापना केली जाते. यापासून व्रताला सुरुवात होते. तुलसी विवाहाच्या दिवशी पहाटे साडेपाच वाजता घट उठवून व्रताची सांगता केली जाते.

उभे नवरात्र करणाऱ्या भाविकांना दररोज पहाटे चार वाजता कार्तिकस्नान करून नगरप्रदक्षिणा घालावी लागते. श्री सिद्धनाथ मंदिरापासून सुरू होणारी ही प्रदक्षिणा महादेव मंदिर (कोट), माणगंगा नदीपात्र, बाजारपटांगण, विठ्ठल मंदिर, जोतिबा मंदिर, खंडोबा मंदिर, सिद्धनाथ हायस्कूल, संत गाडगेबाबा समाधी मंदिर, तुळजाभवानी मंदिर, वडजाई ओढा, लक्ष्मी-मरीआई मंदिर, रथगृह, मारुती-शनी मंदिर आणि श्रीनाथ मठ असा मार्ग पूर्ण करून पुन्हा मंदिरात येते. या प्रदक्षिणेदरम्यान श्रींचा नामजप आणि महिमा सांगणारी भक्तिगीते गायली जातात. १२ दिवसांत येणाऱ्या रविवारच्या दिवशी राजाच्या बागेतील म्हातारदेव मंदिर आणि वडजाई मंदिर येथेही प्रदक्षिणा घालण्याची परंपरा आहे.

या व्रतामध्ये केवळ पुरुष भाविक सहभागी होतात. व्रतधारकांना धोतर नेसून, खांद्यावर उपरणे घेऊन आणि हातात शुद्ध पाण्याचा तांब्याचा कलश घेऊन अनवाणी नगरप्रदक्षिणा करावी लागते. संपूर्ण १२ दिवस हाच पेहराव ठेवावा लागतो. पायात चप्पल घालणे, गावाची वेस ओलांडून बाहेर जाणे किंवा प्रदक्षिणेत खंड पडू देणे निषिद्ध मानले जाते. या काळात जमिनीवर मांडी घालून बसता येत नाही. रात्री झोपतानाही दोन्ही पाय जमिनीवरून वर घेता येत नाहीत. टेबलावर पालथे झोपले तरी किमान एक पाय जमिनीला टेकलेला असणे आवश्यक असते. झोपेत दोन्ही पाय वर गेल्यास व्रत भंग झाल्याचे मानले जाते. पहाटे जाग आल्यापासून सलग १२ दिवस उभे राहून, शुद्ध आचरण आणि पावित्र्य राखत श्रींची उपासना केली जाते.

तुलसी विवाहाच्या दिवशी पहाटे साडेपाच वाजता घट उठवून १२ दिवसांच्या व्रताची सांगता होणार आहे. त्याच दिवशी रात्री बारा वाजता श्री सिद्धनाथ व माता जोगेश्वरी यांचा शाही मंगल विवाह सोहळा संपन्न होणार आहे. अनेक वर्षांपासून पुजारी आणि भाविकांनी श्रद्धेने जपलेली ही कठीण उपासनेची परंपरा आजही अखंड सुरू असून, उभे नवरात्र करणाऱ्या भाविकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.